दोन बोटांची चिमूट करून
भुजा हवेत उंचावून
तो म्हणाला,
" माझं सारं ज्ञान पणाला लावून
मी सांगतो,
या नात्याला भविष्य नाही".
"नश्वरतेचं वरदान असलेल्या
कालजयी प्रेमाला फक्त वर्तमानच असतं"
असं निक्षुन सांगुन
तू माझा हात पकडलास
आणि वाट चालू लागलीस.
युगांमागुन युगं लोटली,
आपण चालतच होतो.
केसांत माळलेले लालगर्द गुलाब
जरासे सुकले म्हणुन त्यांच्याजोडीला
चाफा माळायला म्हणुन
तू जराशीच थांबलीस.
मी हलकेच मागे वळून बघितलं
तर,
आपण तुडविलेल्या वाटेवर
रातराणींचे मांडव उभे होते.
तुझ्या अस्तित्वाची खूण म्हणून
तू मला भेट दिलेल्या
दोन ताऱ्यांचं चांदणं
त्यातुन अलगद झिरपत होतं.
