Friday, 13 May 2022

मी वसंतराव



आयुष्यात परमेश्र्वरी अधिष्ठान मानणार्‍या व्यक्तिच्या घरात एक देव्हारा असतो. अखिल ब्रह्मांडावर सत्ता गाजविणारे देवगण तिथं दाटीवाटीनं असतात. सुबक गोडुला गणपती असतो, लंगडा बाळकृष्ण असतो, कधी रामपंचायतन असतं तर कुठे व्यंकटेशाची प्रभावळ असते. यातल्या प्रत्येकावर त्या व्यक्तिची कमीअधिक प्रमाणात श्रद्धा असते. संकटकाळ असला तर यापैकी एकाला साकडं घातलं जातं तर हर्षोल्हासाच्या प्रसंगी चिमूटभर का होईना साखर यांच्यापुढे ठेवुन कृतज्ञता व्यक्त केली जाते. आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यायचं सामर्थ्य या चिमुकल्या देव्हार्‍यातुनच मिळतं. 


ज्याला सुरांमध्ये ब्रह्म दडल्याचं जाणवतं ना त्याच्या मनांत असाच एक सांगितीक देव्हारा असतो. ज्याच्यात्याच्या समजुतीप्रमाणे ईथे देखील वेगवेगळे सुराधिपती प्रतिष्ठापित असतात. कुणाला लताशिवाय जग अधुरं वाटतं तर कुणाला रफी हा संगीतातला शेवटचा सूर वाटतो. कुणी किशोरच्या भजनांत अखंड बुडालेले तर आशा नांवाच्या कोड्यात काही हरवलेले. अध्यात्मसाधनेत ज्यांना अधिक रुची असते अशी मंडळी ब्रह्माविष्णुमहेश या त्रिमुर्तीच्या पुढं जातच नाहीत. 


अशी एक त्रिमुर्ती माझ्याही मनोगाभार्‍यात गेली अनेक वर्षे आहे. भीमसेन-कुमार-वसंतराव. तशी स्वरदेवतांची मांदियाळीच आहे म्हणा पण तरीदेखील हे तीन अधिक प्रिय. यातल्या प्रत्येकाचं स्वतःचं अनोखं वैशिष्ट्य आहेच. तरीदेखील मनाच्या वेगवेगळ्या अवस्थेत यापैकी कोणाचाही स्वर मन रिझवुन जातो. जगण्याची नवी उर्मी देऊन जातो. वसंतराव हा यातला अती हळवा कोपरा. कारण एकच म्हणजे वसंतरावांना प्रत्यक्ष गातांना ऐकलं नाही. त्यांची एकही मैफल समोर बसुन ऐकण्याचं भाग्य माझ्या ललाटी कोरण्याचं परमेश्र्वर विसरुन गेला. ही चूक केल्यावर परमेश्र्वर बिचारा वरमला आणि त्यानं ठिकठिकाणी वसंतरावांच्या ध्वनिमुद्रितांचा शोध घेण्याचं वेड मला लावुन दिलं आणि जरासा निश्चिंत झाला असावा. काल तर त्यानं स्वतःच्याच चुकिचं प्रायश्चित्त घेतलं आणि 'मी वसंतराव' या चित्रपटाला नेऊन बसवलं मला. 


हा चित्रपट आहे? नाही, ही एक संगीतानं नटलेली गोष्ट आहे चित्रभाषेत सांगितलेली. हे एक कथन आहे संगीताच्या अनवट वाटेचं. ही एक मैफल आहे पडद्यावर रंगलेली. जी तुम्हांला जागचं हलु देत नाही तीन तास आणि मध्यंतर नांवाचा उपचार नसता तरी चाललं असतं असं वाटायला लावणारी. 


मी चित्रपट परीक्षण लिहित नाही आणि तेवढी त्या माध्यमाची मला समजही नाही. पण मला कौतुक वाटलं या संपुर्ण टीमचं हा अवघड विषय हाताळल्याबद्दल. एका माणसाची गोष्ट सांगायची कि एका धडपड्या पण असामान्य गायकाचा संघर्ष दाखवायचा हा नाजुक प्रश्न त्यांनी अचूक सोडवला आहे. यातला कुटुंबवत्सल माणूस कधीच यातल्या गायकावर कुरघोडी करत नाही तसंच गायकाच्या असामान्यत्वापुढं यांतला कुटुंबप्रेमी दबला जात नाही, हे यश पटकथाकाराचं तसंच दिग्दर्शकाचंदेखील. विशेषतः प्रत्यक्ष वसंतरावांचा नातू , राहुल इथं त्यांची भूमिका करत असतांना मोठाच पेच पडण्याची शक्यता होती. कारण आपल्या आजोबांबद्दल त्याची जी काही मतं असतील त्यांचा एकूण चित्रपटावर प्रभाव पडणं सहज शक्य होतं. म्हणजे आजोबा त्याला आजोबा म्हणुन मोठे वाटतात कि प्रतिभाशाली गायक म्हणुन? हा नाजुक प्रश्न सोडविण्यासाठी या प्रकल्पाचा नायक असलेला दिग्दर्शक मोठा कुशल आणि चतुर असणं गरजेचंच होतं, सुदैव असं कि 'निपुण धर्माधिकारी'सारखा खरोखरीचा जाणता दिग्दर्शक आहे. त्याच्या कौशल्याची झलक ठायीठायी दिसतेच पण एका प्रसंगात वसंतराव आणि पुल एका लावणी गायिकेकडे जाऊन तिची लावणी ऐकतात आणि ती ऐकल्यावर वसंतराव स्वतः बैठकीची लावणी सादर करतात, हा प्रसंग पहाच. हे माध्यम निपुण किती ताकदीनं वापरतो हे लक्षांत येईल. वास्तविक चित्रमाध्यम हे छायाप्रकाशाच्या संगतीचं, खेळाचं माध्यम ही गोष्टच भले भले विसरलेले असतांना निपुणसारखा दिग्दर्शक वरील प्रसंगात छायाप्रकाशाच्या कलाकृतीला सुरांचं अद्बितीय कोंदण घालतो ना. अक्षरशः पाणी येतं आपल्या डोळ्यांतुन. या एका फ्रेममधुनच दिग्दर्शकानं आपल्याला जिंकलेलं असतं. 


प्रभातच्या कुंकू या चित्रपटांत म्हणे शांतारामबापुंनी पडदाभर केशवराव दात्यांचा फक्त डोळा दाखविला होता. त्याचं फार कौतुक झालं होतं. मी वसंतरावमध्ये संपुर्ण पडदा व्यापुन उरणारी गोष्ट म्हणजे राहुल देशपांडेचा आवाज. मुळातच अत्याधुनिक मल्टीप्लेक्सच्या अतिअत्याधुनिक ध्वनीयंत्रणेला चारीठांव वापरुन घेण्याच्या ताकदीचा आवाज त्याला लाभला आहे. त्या देणगीचं त्यानं स्वतःच्या मेहेनतीनं सोनं करुन टाकलं आहे. चित्रपट संपलातरी कानांत त्याचा आवाज उरतोच उरतो. आपल्याला आपल्या आजोबांना या चित्रकृतीद्वारे न्याय द्यायचा आहे हा त्याचा निश्चय ठायीठायी जाणवतो. कुठंही आक्रस्ताळा अभिनय नाही की उगाच सुरांवरची हुकुमत दाखविण्याचा अट्टाहास नाही. अभिनय, गायन, संगीत दिग्दर्शन अशा सर्व आघाड्यांवर लखलखीत कामगिरी.  असं यापुर्वी फक्त पु.ल. देशपांडे यांनी करुन दाखवलंय. आणि गंमत म्हणजे पु.ल. या चित्रकथेचे अविभाज्य भाग आहेत जसे ते वसंतरावांच्या आयुष्याचे होते तसेच. पुष्कराजनं ही भूमिका अतिशय छान रंगविली आहे. वास्तविक पुलंसारखा सर्वस्पर्शी प्रतिभेचा माणूस जर कथेत असल तर कथा किंवा पटकथा पुलंच्या बाजुनं थोडीजरी झुकली असती तरी क्षम्य होतं. पण नाही. सतर्क दिग्दर्शकाला नेमकं ठाऊक आहे कि आपल्याला काय सांगायचंय. 


काल हा चित्रपट पाहिल्यावर अनेक भावना दाटुन आल्या. एकतर वसंतरावांना प्रत्यक्ष ऐकता न आल्याची रुखरुख कमी झाली. वसंतरावांच्याच एका मुलाखतीत पुलंनी सांगितलंय कि 'गाण्यांचं आयुष्य सर्वात जास्त असतं' याची प्रचिती आली. पुढची पिढी हे विलक्षण गाणं ऐकेल का? समजुन घेईल का? वेगवान जीवनाचा द्रुतताल सांभाळतांना हा आक्रमक सुरांचा बादशहा विस्मरणांत तर जाणार नाही ना? अशी भिती वाटायची. पण काल चित्रपटगृहात उपस्थित असलेली जीन्स आणि टीशर्टधारी, यो आणि ब्रोची भाषा बोलणारी पिढी बघुन वाटलं कि हा प्रवाह असाच पुढे जाणार आहे कारण तो आहेच तितका निखळ. सच्च्या सुरांना मरण नाही आणि आयुष्यभर वणवण करुन मिळेल तिथुन स्वरांचा मध ज्यांनी गोळा केला त्या वसंतरावांना पुढचीच काय तर पुढच्या अनेक पिढ्या विसरुच शकणार नाहीत. 


अलिकडेच ज्याला हा सुरांचा साक्षात्कार झालाय आणि श्वास घ्यावा त्या गतीनं जो नवनवं गाणं ऐकतोय आणि स्वतःच्या गळ्यावर चढविण्याचा प्रयत्न करतोय त्या माझ्या मुलानं मला हा चित्रपट दाखविला. मन तृप्त झालं. 


तू बारीकसा का होईना पण अन्याय केलास माझ्यावर ही माझी तक्रार जगन्नियंत्यापर्यंत पोहोचली म्हणायची. त्यानं परिमार्जन म्हणुन हे किती नितांतसुंदर दान त्यानं माझ्या पदरी टाकलं बघा.

 ऐकतोयस रे बाबा तु खरोखर ऐकतोस. 


धन्यवाद. आणखी काय लिहिणार? 


श्रीकुल

5/4/2022

श्शु.......! शांतता बोलते आहे

 




तीन आठवडे उलटुन गेले तरी 'मी वसंतराव'चं गारुड उतरत नाहीये. काय असावं कारण? वसंतराव आणि त्यांची गायकी आवडतेच, त्यामुळे असेल का? राहुलचा सहजसुंदर वावर कि निपुणचं दिग्दर्शन? कि तीन तास दर्जेदार गाणी ऐकायला मिळाली म्हणुन? होय, ही सर्व कारणे आहेतच. पण अजुनही एक खास कारण आहे. ते म्हणजे या चित्रपटातली बोलणारी शांतता. 


होय, या चित्रपटाचा गाभाच मुळी बोलणारी शांतता आहे. अनेक प्रसंग असे आहेत या चित्रपटात जेंव्हा ही शांतता स्वच्छ ऐकु येते आहे. ती आपण नीटपणे ऐकावी यांसाठी थोडी आधीपासुन आपली तयारी करुन घेतली जाते आणि अस्सल गवई ज्याप्रमाणे हळुवारपणे समेवर येतो तशी शांतता येते. ती त्या आधीच्या प्रसंगापेक्षा अधिक बोलते, अधिकचं सांगते. 


वसंतरावांची आई लहानग्या वसंतरावांना घेऊन घर सोडते. वडिल बिचारे घराच्या पाशात अडकलेले. सुरुवातीला ते बायकोबरोबर निघतात पण वडिल बंधुंच्या दटावणीपुढं नमतात. निरुत्तर होतात. काहीच बोलत नाहीत. नुसतेच बघत राहतात. त्यांच्या मनांतली घालमेल ती शांतता सांगत रहाते आपल्याला. 


मास्टर दिनानाथ गायकीचं वर्म समजावताहेत वसंताला. "असं गावं ना वसंता कि ऐकणार्‍याला दाद देण्याचंदेखील भान उरु नये." गुरु असंच काही मर्मग्राही सांगतात. त्यामागे त्यांची तपश्र्चर्या असते, अनुभवांच्या भांडारातुन असे बोल येतात. एखादाच शिष्य नेमकं समजतो आणि वाटचाल सुरु करतो. वसंतराव असेच. असं गायचं कि श्रोत्यांना भानच उरलं नाही पाहिजे. याच ध्यासानं नटलेलं गाणं आयुष्यभर सादर करतात. शेवटच्या मैफलित सुरांची अशी अशी पेशकश करतात जणु चमचमणार्‍या शलाकांसह, गडगडाटी धारांचा वर्षाव. श्रोते चिंब झाले आहेत आणि मग येते ती शांतता. जिचा त्यांनी आयुष्यभर ध्यास घेतला आहे. टाळी वाजवायला हात उचलले तरी समाधी भंग पावेल कि काय या भ्रांत अवस्थेत श्रोते आहेत. आता शांतता बोलते आहे. काय म्हणते आहे ती? हे मात्र ज्यानं-त्यानं समजावुन घ्यायचंय. असा भान हरपायला लावणारा अविष्कार आपल्याला आपल्याच मनाच्या खोल गाभार्‍यात घेऊन जातो. तिथला कुठला कोपरा त्यानंतर उजळेल हे सांगता येत नाही. पण कुठल्यातरी हळव्या संधीकालात आपण जातो हे निश्चित. 


एका सवाई गंधर्व महोत्सवात दुसर्‍या दिवशी शेवटी म्हणजे शनिवारी पहाटे रशीदखान गायला बसले. साधारणतः प्रत्यक सत्राचा शेवट नामवंत गायक करीत असत त्या तुलनेने त्यावेळी रशीदजी नवखे होते. मंडपात हलकीशी नाराजी होती. पण रशीदजींनी अप्रतिम ख्याल गायकी पेश केली.  मैफीलीचा शेवट करतांना त्यांनी बडे गुलाम अलींची प्रसिद्ध ठुमरी 'याद पियाकी आये' सुरु केली. आख्खा मंडप स्तब्ध झाला. आपल्याच श्वासाचा आवाज येऊ नये म्हणुन दक्षता घेऊ लागला. सफाईदारपणे समेवर येऊन ते थांबले पण मंडपातुन जराही आवाज आला नाही. काही क्षण असच शांततेत गेले, सोन्याहुनही मौल्यवान शांतता. अचानक वळिवाच्या तडतडीप्रमाणे टाळ्यांचा अखंड नाद घुमायला लागला. वन्स मोअरचा गजर झाला. ऐंव्हाना रमणबाग शाळेची मुलं सकाळची शाळा असल्याने यायला लागली होती. आता वन्स मोअर घ्यावा की अनुभवलेली शांतता कवटाळुन थांबावं या संभ्रमांत रशीदजी होते. इतक्यात साक्षात पं भीमसेनजी उठले आणि त्यांनी पुन्हा गाण्याचा जणु आदेशच दिला. पुन्हा अप्रतिम अदाकारी, तीच सुरांची लयलुट, यावेळी अंदाज असुनही ठुमरी संपल्यावर मंडपात नीरव शांतता. 


तुम्हीच कल्पना करा, काय बोलली असेल ती शांतता? काय सांगितलं असेल तीनं रशीदजींना? काय तरंग निर्माण झाले असती श्रोत्यांच्या मनांत? आठवत असेल त्यांना तो क्षण आजही? 


बेगम अख्तर यांना आपण का गायचं हे नेमकं उमगलेलं होतं. " मैं सुकुन के लिए गाती हूॅं". तो सुकुन, ती शांतता जिच्यासाठी कलाकार अतोनात कष्ट करतात, प्रत्येक श्रोता प्रत्येक मैफिलीला जातांना आजतरी ही शांतता अनुभवायला मिळेल या आशेवर जातो. ती शांतता मुकी असते असं कसं बरं म्हणता येईल? अशी शब्देविण संवादु साधायला लावणारी शांतता मी वसंतरावमध्ये अचानक भेटते ना, तेंव्हा काय होतं? 


काहीच नाही. फक्त शांतता. निखळ, नितळ शांतता.



श्रीकुल

23/4/2022

मौनाचे आलाप


 

सायंराग

 


कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...