Friday, 11 May 2018

माहेर



मला ना, असं नीट संगतवार नाही सांगता येत पण प्रयत्न करते. तशी मी कॉमर्सची पोस्टग्रॅज्युएट पण असं धडधडुन नाही बोलता येत. इतक्या मैफिली करते पण, गातांना असलेला आत्मविश्वास बोलतांना कुठे जातो कोणास ठाऊक. पण अरू, म्हणजे माझा नवरा, नेतो निभावून सगळं. 

पण आज सांगणार आहे.  अगदी भरल्या मनानं. डोळ्यात पाणी आलं तरी थांबणार नाही. बायकोच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या नवऱ्याविषयी बायकोने सांगायचं नाही तर कुणी?

अदूच्या, आमच्या मुलाच्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या दिवशीच अरुनं त्याला सांगितलं ,
 "तुझ्या कंपनीचा टर्नआओव्हर पन्नास कोटींवर गेला कि मी रिटायर होणार".
" आणि काय करणार "
" मला भरपूर काम आहे. मला देणं द्यायचंय. मी आपल्या शेतीवर जाणार."

मग आम्ही अरुची खूप चेष्टा केली. याला काळ्या मातीचं देणं द्यायचंय, तिचे पांग फेडायचेत. असं बरंच. पण अरूनं नेमकं उत्तर दिलेलं नाही हे मला मात्र समजलं होतं. कळतात आम्हां बायकांना खरी आणि खोटी उत्तरं. म्हटलं जातो कुठे, कळेलच आज ना उद्या. पण त्याला जे देणं द्यायचं होतं ते असं इतकं मनात रुतून बसणारं असेल हे मात्र तेंव्हा नव्हतं वाटलं.अरू ना, तसा पूर्वीपासूनच विचित्र होताच. आमच्या लग्नाच्यावेळी नाही का असाच अडुन बसला कि माझं आणि माझ्या मित्राचं लग्न एकाच ठिकाणी होणार म्हणुन. अण्णांना (माझे वडिल) वाटलं कि असेल जवळचा प्रेमाचा मित्र. असते काहिंची दाट मैत्री. म्हणुन आण्णा सहज हो म्हणाले. पण मित्राचं नांव ऐकल्यावर चांगलेच सटपटले. 'अयुब' त्याचं नांव. अयुब आणि शमीमा यांचं लग्न आमच्याबरोबर, एकाचवेळी लागलं पाहिजे म्हणुन हट्टच धरला अरुनं.
 "वाटल्यास मी खर्च करतो त्यांच्या लग्नाचा पण एकत्र नको". अण्णांनी ऑफर दिली.
 तर हा म्हणाला, "शब्द बदलु नका.माझ्या लग्नाचा खर्च मीच करणार हे तुम्ही मान्य केलंय. लग्न माझं आणि बोजा तुमच्यावर हे कुठलं गणित?"

जुनी माणसं ती. त्यांना हे पचणं जरा अवघडच होतं पण अरूनं पटवलं. एकाच मांडवात मंगलाष्टका आणि निकाहनामा म्हटल्या गेल्या.

अयुब, म्हणजे अरूची सावलीच. लहानपणापासून बरोबर. अरू धडपडत शिकला आणि फॅब्रिकेशन वर्कशॉप चालू केलं. पहिला माणूस नेमला तो अयुब. बिचारा आई-बापाविना वाढलेला. शिक्षणाचा गंध नाही. अरूसारखा मित्र हीच काय ती जमेची बाजू. जमेल ते काम करून पोट भरायचा. मनानं अति निर्मळ.घरदार नसलेल्याला मुलगी तरी कोण देणार? पण शोधली अरुनं. शमी पण अयुबसारखी अनाथ. पण काय देखणी रूपानं. स्वयंपाक तर असा करते किं बोटं चाटावीत जेवल्यावर. तिच्या मावशीच्या नवर्याला अरूनं सांगितलं कि तुम्हांला मुलगा पसंत असेल तर फक्त हो म्हणा, बाकी या दोघांची आयुष्यभराची जबाबदारी माझी.

आमच्या लग्नानंतर व्यवसायाने अशी झेप घेतली. दिवसाचे चोवीस तास कमी पडावेत. दहा वर्षांत एका लहान वर्कशॉपची चांगली चारशे माणसांची कंपनी झाली. आम्ही विठ्ठलवाडीला आता राहतो ना तो बंगला बांधला. आम्ही म्हणजे, अयुब आणि शमीसुध्दा. त्यांना बंगल्याच्या आवारात खोल्या काढुन दिल्यात. अयुब म्हणजे ड्रायव्हर कम असिस्टंट कम बरंच काही. तर शमी सतत माझ्याबरोबर. घरीदारी, मैफिलीला सतत बरोबर.

सगळं चांगलं होतं पण म्हणतात ना काहितरी खुसपट काढल्याविना मनाला शांत बसवतच नाही म्हणुन. तसं म्हणा हवं तर. पण आज सांगते, अरूची एक गोष्ट फार खटकायची मला. रोज त्याच्या तोंडुन नव्या मैत्रिणीचं नांव कळायचं. ही काय तर म्हणे कॉलेजमध्ये होती, तर ती तर बालवाडीपासुनची मैत्रीण. हीच्या बरोबर एकाच गल्लीत रहात होतो तर ती म्हणे माझ्या मावसबहिणी ची मैत्रीण म्हणून माझी मैत्रीण. सुरुवातीला छान वाटलं पण कुणा बाईला आपल्या नवऱ्याच्या इतक्या मैत्रिणी असलेल्या आवडतील? म्हणजे तुम्हाला वाटतं तसं वावगं काहिच नव्हतं. 'त्याअर्थी' अरू अगदी निर्मळ होता. पण चिडचिड व्हायची खरी. 

आमचा संसार वाढीला लागला. अद्वैतचा जन्म झाला. मग मला माझं गाणं थोडं आवरतं घ्यावं लागलं खरं पण सुख मात्र उतू जायला लागलं. आदूचं बालपण आम्ही मस्त एंजॉय केलं. आदू, अरु आणि आदूचा आबूकाका जाम दंगा करायचे. आई आणि आण्णा अगदी भरून पावले होते. तेव्हढ्यात किरकोळ आजाराचं निमित्त होऊन आई गेली. तिचे दिवसवारे करून येताना अरू आग्रहाने अण्णांना घरी घेऊन आला, कायमसाठी. ते घरी आले म्हणुन आनंद झाला खरा पण आई गेल्याने माहेर नसल्याचं वाटायला लागलं. मी अरूला तसं बोलुनही दाखवलं तर तो म्हणाला की आता तुझं सासर-माहेर एकच. छान आहे ना?

काय छान? माहेराची ओढ काय असते ते पुरूषांना काय कळणार? आईकडे जाऊन आयतं बसुन खाण्यातली मजा काय हे कसं समजवायचं? या एका मुद्द्यावर मात्र अरूच्या तीन मैत्रिणी म्हणजे रागिणी, नीला, रूपा आणि माझं एकमत झालं. त्या तिघींनीतर आई-बाप दोघांचंही छत्र गमावलं होतं. कालाय तस्मै नमः.

पण शेवटी काळच त्यावर उत्तर शोधुन देतो. आदू मोठा झाला आणि मी गाणं पुन्हा चालू केलं. आदूनं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि आपण स्वतंत्र व्यवसाय सुरू करणार असल्याचं सांगितलं. त्यानं सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली. त्याच दिवशी अरूनं त्याचा रिटायरमेंट प्लॅन सांगितला. आदूच्या प्रगतीनं सुखावलेले अण्णा थोड्याच दिवसांत गेले आणि माझं उरलंसुरलं माहेरही संपलं. मी फारच खंतावले. तर अरु म्हणाला, "करू काहितरी". 
 
पण काय करणार? 
माझे आई-वडील तर तो परत आणू शकत नव्हता ना. मग का असं बोलायचं त्यानं तरी? 
खोटी समजूत पण किती खोटी? 
तिला काही अंत? 
 
पण अरू म्हटलाय ना, मग करेल काहितरी. या आशेवर कढ सोसत राहिले. दर सणावाराला माहेरची सय यायची मला. सगळी सुखं दारात होती पण आता कुठंतरी एक हळवा कोपरा होताच . 

गेल्या पाडव्याची गोष्ट. आपल्या कंपनीला तीन वर्षे झाली म्हणून आदूनं जंगी पार्टी दिली. आणि टर्नओव्हर पन्नास कोटींवर गेल्याचं जाहीर केलं. अरूनं दुसऱ्याच दिवशी आपल्या कंपनीचाही कारभार त्याच्या हाती दिला. आम्ही भोरच्याजवळ काही शेतजमीन घेतली होती तिकडं निघाला. त्याला मातीचे देणं द्यायचं होतं ना! निघतांना बजावुन सांगितलं की, " एक वर्ष कोणीही तिकडं फिरकायचं पण नाही,अगदी अयुबसुध्दा नाही."

तो जाऊन आता वर्ष होत आलं. तसा तो अधुनमधून यायचा पण काय चाललंय हे अजिबात सांगायचा नाही. परवा त्याचा फोन आला आणि म्हणाला की ,
 
 "या रविवारी तू आदूच्या गाडीतून ये."
"का? अयुब कुठे जाणार आहे?"
"अयुबला राहू दे, तू मी सांगतो तसं कर."

रविवारी अयुबची गाडी आणि आमची गाडी एकाचवेळी शेतावर पोहोचल्या. अयुबच्या गाडीत आणखी कोणी होतं. मी काही विचारणार एवढ्यात आदू जोरात ओरडला,

" आईईईई, ते बघ काय सुंदर घर!"

समोर एक नितांतसुंदर वाडाटाईप घर होतं. घरावरनं नजर हटत नव्हती इतकी देखणी वास्तू. कौलारू छप्पर, पुढं ऐसपैस ओसरी, ओसरीमध्ये झोपाळा. घराला नावाची पाटी होती पण ती झाकलेली होती. अरू पुढे आला आणि म्हणाला, 
 
" निशा, कसंय सरप्राइज?"
"या, तुम्ही पाचही सुवासिनी पुढे या."

पांच?

मी मागे वळून बघितलं तर रुपा, नीला, रागीणी आणि शमी होत्या. शमीचं काही नाही पण या तिघी यावेळी इथं कशाला? मी अयुब कडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं तर त्यानं माहित नाही अशा अर्थाने खांदे उडवले.

" या पुढे या आणि घराचं उद्घाटन करा. ते पाटीवरचं कापड काढा. पांच जणींनी मिळून. मला माझं देणं देऊ देत."

आम्ही कापडाला हात लावला. त्या तिघींबरोबर हात लावताना कसंसच झालं मला. कापड निघालं, नांव झळकायला लागलं. काळ्याशार दगडी पाटीवर सोनेरी अक्षरात नांव होतं

'मा हे र '

क्षणभर सुचलंच नाही. काहितरी लक्ककन हललं आतमध्ये. थोडा वेळ अशाच अवस्थेत गेला. हळूहळू मन ताळ्यावर यायला लागलं.
 
 पण हे काय? 
नजर अशी अंधुक का? 
डोळ्यासमोर हा पडदा कसला? 
आणि हा हुंदक्यांचा आवाज? 
 
आणि ही मिठी कोणाची? एक नाही चार-चार जणींचे हात गळ्यात पडलेले आणि एरवी सुरांची बरसात करणारा माझा कंठ असा कसा दाटलेला?

मला माहेर देणाऱ्या नवऱ्याबद्दल प्रेम की मैत्रिणींना पण माहेर देणाऱ्या माझ्या 'अरूचा' अभिमान? 
काय, काय सांगू?

मी आधीच सांगितलं ना,  मला नाही सांगता येत.

Monday, 7 May 2018

अबोली


'पाच वाजता पाताळेश्र्वरापाशी,
                 सरत्या उन्हात काही मनातलं '


नांव वाचायची गरजच नव्हती.वळणदार अक्षरावरूनच कळत होतं. चिठ्ठी 'चित्राची' होती. किती वर्षांपासून हे वळण बघतोय. किती वर्षांपासून ती माझ्या आयुष्याचा भाग आहे.
मला वाटतं, आम्ही दुसरीत असताना दोन घरं पलिकडे साठे काकू रहायला आल्या. 'चित्रा' त्यांची मुलगी. माझ्याच वर्गात होती. आमचं अगदी गूळपीठ जमलं. त्या वयात सहसा न आवडणारा 'अभ्यास' हा आमचा दोघांचा आवडता. शाळेतुन आल्यावर हातपाय धुवून, देवाचं काय ते म्हणायचं मग आई देईल ते तोंडांत टाकुन  मी आणि चित्रा विठ्ठल मंदिरातल्या दिक्षित सरांकडे जायचो. मी पेटी शिकायचो तर चित्रा गाणं. अतिशय गोड आवाज होता तिचा, अजुनही आहे.
त्यानंतर चित्राच्या घरी. त्यांच्या घरासमोर ऐसपैस ओवरी होती. ती म्हणजे आमची 'स्टडी-रूम'. तब्बल बारावीपर्यंत आम्ही तिथंच अभ्यास केला. काय धुंदीतले दिवस होते. आम्हांला दोघांनाही जरी अभ्यासाची आत्यंतिक आवड असली तरी आमचे आवडीचे विषय वेगवेगळे होते. चित्राला गणीतात अफाट गती होती. तिचं गणितावरचं प्रभुत्व विलक्षण होतं. आम्ही सगळे तिच्यापुढे अक्षरशः लिंबूटिंबू होतो.



आमचं गाणं आणि अभ्यास असा जोरात असतानाची गोष्ट. एका रविवारी चित्रा सकाळी सकाळी ओरडतच आली.
"नानू, नानू लवकर चल"
"काय झालं, कुठं जायचं?"
'तू चल तर आधी".
आम्ही पळत गेलो. चित्रानं तिच्या घरातल्या अंगणात नेलं. तिथं एक छोट्या झाडावर असंख्य फुलं उमलली होती. त्यांचा रंग विलक्षण मोहक होता. अगदी बघत रहावं.
" कुठली फुलं गं ही?"
" अबोली" चित्रा म्हणाली.
"अबोली, अबोली". मला ती फुलं, त्याचं नांव आणि रंग सगळं बेहद्द आवडलं. पुढचे काही दिवस मला दुसरा विषयच नव्हता. सतत अबोली, अबोली. का कुणास ठाऊक पण मला ती फुलं कधीच तोडावीशी वाटली नाहीत. त्या अबोली रंगाने माझ्यावर अशी मोहिनी घातली किंवा नंतर जिथं-जिथं अबोली रंग दिसला कि बघतच रहावं वाटायचं. चित्रा किती तरी वेळा म्हणाली कि
 "तुला देऊ का अबोलीची फुलं?"
 पण नाही घ्यावीशी वाटली.‌ती जिथं उमलतात तिथंच चांगली वाटायची मला. आणि ती अबोली त्या छोट्याश्या झाडांवर काय छान दिसायचीत.त्यांचं ते नाजूकपण, तो हळवा रंग काय, काय सांगू? सगळंच आवडायचं मला.

त्या धुंदीतुन मला रामदादाने बाहेर काढलं खरं पण 'अबोली' मनात रुतून राहिलीच. अरे हो, सांगायचं राहिलंच, 'रामदादा' म्हणजे माझा दादा. माझा आणि चित्राचा आदर्श होता तो. शांत, धीर-गंभीर आणि अत्यंत हुषार. अभ्यासातलं एकही पारितोषिक असं नव्हतं कि ते रामदादानं मिळवलं नव्हतं. आम्ही दोघंही त्याचे पित्तू होतो. आमची अभ्यासातली प्रगती, चित्राचं गाणं, माझी पेटी या सगळ्यांवर त्याचं बारीक लक्ष असायचं पण अगदी मायेनं. 


आम्ही अकरावीला असतांना, रामदादा आय आय टी मधुन सुट्टीसाठी आला आणि तडक चित्राच्या घरी गेला.
"चित्रा, बारावीनंतर पुढे काय?"
" नानू, मेडिकलला जायचं म्हणतोय"
"आणि तुझं काय?"
" मी, काय करू? नानूशी बोलले नाही अजुन"
" तू ऐक, तू केंब्रिजला जाऊन Mathematical Tripos कर. नानूला जाऊदे मेडिकलला."


झालं.रामदादाचं सांगणं म्हणजे आमच्यासाठी 'ब्रह्मवाक्य'. आम्ही अगदी झटुन अभ्यास केला आणि मी बी.जे ला आणि चित्रानं Cambridge University च्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये Mathematical Tripos साठी अॅडमिशन मिळवलीच. आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. रोज एकत्र अभ्यास करणारे मी आणि चित्रा, आता आमच्यात हजारो मैलांचं अंतर पडलं. संपर्कासाठी त्याकाळी पत्राशिवाय दुसरं साधनच नव्हतं. सुरुवातीला असोसून पत्रं लिहिली आणि उत्तराची वाट बघितली. नंतर अभ्यास वाढत गेला. पीजीच्या कोर्समध्येतर आकंठ बुडवुन घेतलं.
सतत ते डिसेक्शन्स,   अॉपरेशन्स, मानवी अवयव या सगळ्या धबडग्यात कुठेतरी अबोली रंग दिसायचा आणि चित्रा आठवायची. तिचं गाणं आठवायचं, आठवायचं कि किती विलक्षण नातं जगलो आपण.

आज चिठ्ठी मिळाली आणि एक आणि एकच काम उरलं ते म्हणजे चित्राला भेटणं. कशी दिसत असेल? काय बोलायचंय तिला मनातलं? लग्न तर करून आली नसेल? छे, शक्यच नाही.
अशा उलघालीतच पाताळेश्र्वर गाठलं.

समोरच


समोर


स...


चित्रा उभी.


 नितांत सुंदर.
अबोली रंगाची ओढणी लपेटुन.

काही क्षण दोघांनाही वाचाच फुटेना.खूप बोलायचय हे नजरेतून समजत होतं पण ध्वनी हरवलेला. एक बुढ्ढिके बाल विकणारा मुलगा आला आणि आम्ही भानावर आलो.
"नानूऊऊऊ..."
"बुढ्ढिके बाल घे ना. आपण त्यांना आठवणींचा कापूस म्हणायचो, आठवतंय का?"
आम्ही आठवणींचा कापूस घेऊन तो पिंजायला सुरूवात केली.


"कशी आहेस तू"
"मी छान आणि मजेत आहे. तुला कशी दिसते? पण ऐक ना, मी नाही विचारणार तू कसा आहेस म्हणुन"
"का गं?"
"कारण मला माहिती आहे तू कसा आहेस. काय करतोस. सगळं-सगळं माहितीय्यै"
तीन दिवसांपूर्वी मी आले ते तडक तुझ्याकडेच पण तू अॉपरेशन थिएटरमध्ये होतास आणि तुला वेळ लागणार होता. मग म्हटलं बघावं नानूशेठ नेमकं करतात तरी काय? खुप जणांशी बोलले मी. कसला पॉप्युलर आहेस नानू तू. मला फारच अभिमान वाटला."


 "पॉप्युलर, बिप्युलर सोड.ते मनातलं काय सांगणार होतीस"? आणि अशी तडक कशी आलीस?"

"मी लंडनहुन निघाले, बाय द वे, माझं ट्रायपॉस पूर्ण झालं. तर निघाल्यापासून तुझेच विचार डोक्यात. कसा दिसत असशील, काय करत असशील, तुला मैत्रीण असेल का? "
"मैत्रिणीचंच का?'
"कारण मला तुझ्याशी लग्न करायचं होतं"
"क्काय? आणि होतं म्हणजे ?"
"हो, तुझ्याशी लग्न करायचं म्हणुन फार घाईत आले मी. हा विचार माझ्या मनांत आला तेंव्हापासून चैनच नाही मला. नानू माझा होणार, मी नानूची बायको होणार. इतकी सुखावले ना मी. विमानांत डोळे मिटून तुलाच बघत होते. पण नानू, माझे विचार पुढेच सरकेनात.मुलींना कशी संसाराची स्वप्नं पडतात ना, तसं काहिच होईना. म्हणजे आपलं लग्न झालंय, घर आहे आपलं, आपली मुलं आहेत असं काहि डोळ्यासमोर येईना. परत परत प्रयत्न केले पण असं ज्याला 'आपलं', 'दोघांचं' फिलिंग म्हणतात ना ते येईचना.मी अगदी सैरभैर झाले रे. मला वाटलं कि बाहेरून जरी मला तुझ्याशी लग्न करावं वाटत असलं तरी आतुन मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत असेन. मग मी तुझ्या जागी दुसऱ्या मित्रांना कल्पुन बघितलं तर फारच वाईट वाटायला लागलं. तुला नवरा या चौकटीत बसवलं किंवा सगळंच चित्र बिघडतंय. अख्ख्या प्रवासात मी अशी सैरभैर होते. पण विमान उतरतांना मीही शांत झाले. आणि हे सगळं तुला लग्गेच सांगायचं म्हणुन तुझ्या कॉलेजमध्ये आले. तर आमचे राजाधिराज नानूमहाराज चिरफाड करण्यात मग्न. मग मी सगळीकडे हिंडले, खूप जणांना भेटले  शरयूला भेटले.तिची मावशी माझ्याच डिपार्टमेंटमध्ये आहे. तिच्याकडुन खुप ऐकलं होतं कौतुक. खूप छान आहे ना शरयू!"


"तर मिस्टर नानू, प्रचंड विचारानंतर मी तुला मागणी घालते आहे"


" चित्र्ये, जरा मला समजेल असं बोलशील? तू जे काही बोलते आहेस ना ते तुझ्या गणिताइतकंच 

अवघड आहे गं"
"नानू, अरे तुझ्यासारख्या अत्यंत जवळच्या मित्राला जर मी नवरा या भूमिकेत बघू शकत नसेन आणि संसाराचं पूर्ण चित्र बघून शकत नसेन तर कदाचित माझं संसारचित्र माझ्या एकटीचंच असेल. "


" आठवतं, एकदा तू विचारलं होतं कि गाणं आणि गणित अशा दोन भिन्न गोष्टींत मला रस कसा?"
" आठवतंय ना, तेंव्हा अगदी तू थाटात म्हणाली होतीस कि, दोन्ही गोष्टींत साम्य आहे. संगीतात सूरांचं गणित जमावं लागतं तर गणितात आकड्यांशी सूर जमावे लागतात".


" करेक्ट, आणि संसारात तर संगीत आणि गणीत दोन्ही जुळावं लागतं ना रे."
"मग ते मागणीचं काय?"
"येस, तर राजाधिराज सम्राट नानू महाराज मी चित्रा, तुम्हांला मागणी घालते आहे.........



"शरयू साठी".


"मला माहित आहे कि  तू असा विचारच केलेला नाहीस. पण तू आणि शरयू शोभुन दिसाल एकमेकांना. तस्मात, नानूराजे अजिबात वेळ न गमावता शरयुशी बोला."


" बोलण्यावरून आठवलं, मी रामदादाशी बोलले, त्याला सगळं सांगितलं."


"काय म्हणाला रामदादा?"


" फिस्सकन हसला आणि म्हणाला, अबोली आहेस अबोली".

कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...