Saturday, 22 August 2020

प्रथमं वक्रतुंडंच

 


हे गणराया, सुदिन सुवेळ तुझं आख्यान मांडलंय. ते तू ऐकायला ये. रिद्धि-सिद्धिंसह ये, जगज्जननी माता पार्वतीसह ये. सेनापती कार्तिकेयासह ये. मोहलोभरुपी मदनाचा नाश करणार्‍या भगवान शंकरासह ये.

अरे, पण तुला बोलाऊ धाडतोय म्हणुन आश्चर्य वाटुन घेऊ नकोस. तू माझ्याच ठायी आहेस याची मला जाणीव व्हावी येवढंच मागतोय. तूच माझी बुद्धी आहेस ना ! याची जाणीव मला सदोदित असु देत.

सूर्यकोटि समप्रभ म्हणजे कोट्यवधी सूर्यांच्या प्रकाशाइतकी प्रभा असलेला तू माझ्याठायी नित्य निवास करुन आहेस याचा मला विसर न पडू दे.

तीनशे साठ अंशात वळण्याची क्षमता असलेल्या तुझ्या सोंडेसम असलेली माझी बुद्धि अशीच साकल्याने सर्व प्रसंगात वापरण्याची चिरंतन प्रेरणा मला मिळू देत. मग माझं प्रत्येक कार्य निर्विघ्न पार पडेलच असा विश्वास मला राहु देत.

तुझ्या आकाराइतकाच माझ्या बुध्दिचा आवाकादेखील
महाकाय असु देत.

माझ्या प्रत्येक विचारांत, प्रत्येक कृतीमध्ये तुझं अधिष्ठान असावं इतकंच.

श्रीकुल
भाद्रपद शु. चतुर्थी शके १९४२
22/8/2020

कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...