संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन घराण्यांमधला फरक असतो. सूर सातच आहेत आणि रागांची संख्याही मर्यादितच आहे. कुणा घराण्याची सूर लावण्याची वेगळीच पद्धत तर कुणाची आलापी आगळीवेगळी तर कुणाच्या गायकीत मध्यात गाणं खुलविण्याची खुबी,कुणाकडे अमुक रागमहत्वाचा तर दुसर्याला नेमका तो वर्ज्य. असे अनेक भेद त्याहुनही त्या-त्या घराण्यांच्या उस्तादांची एकमेकांविषयी असलेली खुन्नस आणि तिच्या कहाण्या मोठ्या रंजक असतात. प्रत्येक घराण्याचे शिष्य आपल्या घराण्याच्या गायकीविषयी आणि होऊन गेलेल्या ऊस्तादांच्या स्वरकौशल्याविषयी आत्मीयतेने आणि हिरीरीने बोलत असतात. एकमेकांविषयीचं यांचं सोवळंओवळं भलतंच कडक असतं. केवळ दुसर्या घराण्याच्या उस्तादांचं गाणं ऐकायला गेला या कारणास्तव कुणा एका गुरुने आपल्या शिष्याच्या कानशिलांत भडकावली होती.
हे झालं 'तानसेनांच्या' म्हणजे स्वराविष्कार करणार्यांच्या किंवा गायकांच्या घराण्यांबद्दल पण आज आम्ही 'कानसेनांच्या' म्हणजे ज्यांच्या कानांवर हा तानसेनांच्या घराण्यांचा डोलारा उभा आहे त्यांच्याविषयी आणि त्यांच्या घराण्यांविषयी काही मौलिक संशोधन मांडणार आहोत. अशाप्रकारचं संशोधन यापुर्वी झाल्याचं आमच्या कानांवर आलेलं नाही त्यामुळे हे इतकं मोलाचं संशोधन प्रथमच करण्याचा मान अर्थात आमचा आहे हे नम्रपणे नमूद करतो.
गायक-वादकांमध्ये जसे हौशे-नवशे-गवशे असतात म्हणजे ज्यांनी अजुन कुठल्याच घराण्याचा काठ पकडलेला नाही असे असतात तसंच काहिसं 'कानसेनां'मध्येही असतात. ही जमात चटकन ओळखु येते. 'अण्णा' ऐवजी जे भिमसेन जोशींचं गाणं ऐकलं म्हणतात तो नवखा समजावा.
आमच्या प्रदीर्घ संशोधनांत आम्हांला कानसेनांची अनेक घराणी आढळली पण आपल्या गुणवैशिष्ट्यांनी आणि उग्र प्रकृतीनं ज्या एका घराण्यानं आम्हांला सर्वाधिक प्रभावित केलं ते म्हणजे 'कानसेन-घराणं पुणे'. कानसेन घराण्यांना संस्थापक नसतात, असतात ती दैवतं. त्या दैवतरुपी गायकाच्याप्रती निष्ठा किती मोठी यांवर एखादा कानसेन किती घरंदाज आहे हे ठरतं. 'वीस वर्षे मी अण्णांना ऐकतोय असं मी एकाला सांगत असतांना शेजारचा फटकन म्हणाला "अण्णा वीस वर्षांचे होते तेंव्हापासुन त्यांना ऐकतोय. मी आणि त्याने त्वरित आपापले कान चिमटीत धरले.'आण्णा' हे पुणे घराण्याचं कुलदैवत तर वसंतराव हे उपदैवत. कुमारांविषयी आदर. यापुढे भारतीय गायकी अस्तित्वातच नाही हा दृढविश्वास. आजही 'आण्णा' नाहीत यावर विश्वास नसणे ही निष्ठेची खूण आहे.
या घराण्यांतील रथी-महारथींना भेटण्याची जागा म्हणजे 'सवाई' मध्ये. जो सवाई म्हणजे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव असा पुर्ण उल्लेख करतो तो माँटेसरीतच नापास होतो. खरा उच्चार'सवाई' इतकाच.आण्णा गेले आणि सवाईतला राम गेला यावर सर्व सदस्यांचं एकमत. सवाईत हे खुर्ची, सोफा वगैरे आरक्षित करण्यांच्या भानगडीतच पडत नाहीत. सरळ मोकळ्या मैदानावर भारतीय बैठक आणि पाहिजेल तेंव्हा चहा-वड्याचा आस्वाद घेण्याचं स्वातंत्र्य हे मनमुराद उपभोगतात. यापैकी अनेकजण तर केवळ रात्री वडापाव चवीला कसा लागतो यासाठीच येत असावेत असा माझा संशय होता. सवाई फार पुर्वी रेणुकास्वरुप शाळेत भरत असे, या शाळेचे व्हरांडे म्हणजे लगीनघर वाटावं असा थाट असायचा. पट्टीचे कानसन गाद्या-उशा , चहासाठी साहित्य, स्टोव्हसुद्धा घेऊन यायचे. पुणे घराण्याच्या पुर्वजांनी किती कडक तपस्या केली आहे याची जाणीव नाही तुम्हांला महाराजा! दुपारपासुन जागा धरायला घरातली चिल्लीपिल्ली पाठवायची. कार्यक्रम सुरु होईतो बिचारी पेंगायला लागायची नंतर तर गाढ झोपुन जायची. पण पुढे जाऊन हीच मुलं पुणे घराण्याची आधारस्तंभ होणार असतात. हाही त्याच तपश्चर्येचाच भाग.
आता सदस्यत्वाबद्दल झालं, नियमांबद्दल बघुयात.
वर्तनावरुनच कानसेन पुणे घराण्याचा सदस्य ओळखु येतो. वर्तनाबाबत हे अत्यंत कर्मठ असतात. साधारणतः या घराण्याचा सदस्य आजुबाजुला शक्यतो तरुण सदस्य पाहुन जागा निवडतात. म्हणजे अधुनमधुन या तरुण मंडळिंना जुन्या मैफिलीतल्या आठवणी सांगता येतात. भारावलेल्या पहिलटकर तरुणांना अमुक गायकात दम नाही, याची तान आता पुर्वीसारखी येत नाही, तमक्याचा गळा आता पुर्वीसारखा फिरत नाही. असले अनुभवी बोल सांगता येतात. काही तरुण त्याला 'फेकणे' म्हणतात तो भाग वेगळा. म्हणणारे म्हणु देत पण सांगणार्याचा तेजोभंग काही केल्या होत नाही.हे देखील पुणे घराण्याचं वैशिष्ट्य.
अशा दोन-चार किश्श्यांनंतर नवागत सदस्यांच्या डोळ्यांत अपार आदर दिसु लागतो. एकदा हा आदर कमावला कि आपली जागा गमावण्याचा धोका उरत नाही व आपण पाहिजे तेंव्हा चहावड्याचा आस्वाद घ्यायला मोकळे. हा धूर्तपणा अंगी असावा लागतो. मात्र यासाठी पदरी किश्शांचा संग्रह असावा लागतो. त्यासाठी नवागत असतांना गाण्याकडे दुर्लक्ष करुन किश्श्यांच्या मैफिलीत श्रवणभक्ती करावी लागते. मुळातच आपण गाणं ऐकण्यासाठी आलेलोच नाही, उदंड ऐकुन झालंय. आता केवळ पाय इकडे वळतात म्हणुन यायच. असा आव असला पाहिजे.
येवढं जमलं कि तुम्ही "कानसेन घराणं -पुणे'चे गंडाबंद शागीर्द झालेच म्हणुन समजा. कोणी कितीही टीका करो आपण आपला बाणा आणि नव्या गायकाचं गाणं किंवा वादन कितीही आवडलेलं असलं तरी नाकं मुरडणं थांबवायचं नाही. एक से एक गायक ऐकलेत आपण. हा जो वाजवतोय ना त्याच्या गुरुला आपण ऐकलंय हा तोरा कायम ठेवावा. सर्वात महत्वाचं म्हणजे "कानसेन घराणं -पुणे'चे सदस्य होण्यासाठी तुमचा मुक्काम पुणे येथे असणं अजिबात गरजेचं नाही. हे सदस्यत्व मुक्कामाच्या पत्त्यापेक्षा अंगातल्या गुणांवर मिळतं. हे मोठं वैशिष्ट्य आहे.
तसं या घराण्याविषयी सांगण्यासारख भरपूर आहे. तूर्त इथंच थांबतो. यावर्षीच्या 'सवाई'त यापुढचं सांगेनच, फक्त मी चहावडा मारुन येईपर्यंत माझी जागा मात्र धरुन ठेवाल का?
श्रीकुल
18/3/23
