Sunday, 8 September 2019

चिडलोय


मी चिडलो आहे हि बातमी वार्‍याच्या वेगाने पसरली.

कारण मी कधीच चिडत नाही. हसनेसे सबकुछ हो जाता है तो चिडनेका कायकू? असा आपला शिंपल फंडा. नॅन्सीनं हि बातमी शलाका म्हणजे माझ्या बायकोला सांगितली. नंतर नोटिस बोर्डवर लावल्यासारखी अॉफिसमध्ये पसरली. P-Soft Technologies हे आमचं अॉफिस. परांजपे नावाच्या एका चतुर माणसानं काळाची पावलं ओळखुन नव्वदच्या दशकात हि सॉफ्टवेअर कंपनी चालू केली. मी इंजिनिअर झालो आणि पहिलाच जॉब इथं मिळाला. माझं काम आणि हसणं परांजप्यांना फार आवडायचं. " जग जिंकशील लेका या जोरावर" असं म्हणायचे मला. नव्व्याण्णव साली माझ्या नावावर चाळिस टक्के शेअर्स करुन दिले आणि स्वतः अमेरिकेला स्थायिक झाले. तेंव्हापासुन मीच सगळं बघतोय. पण हे माझ्या चिडण्याचं कारण नाही.

आमचा पसारा तसा बराच मोठा आहे. पण नॅन्सी उर्फ EP- Everthing Possible आणि जगन —ADM म्हणजे Any Duty Manager हे दोघे हा पसारा लिलया सांभाळतात. नॅन्सी रोज सकाळी तिची नॅनो, तिला ती नॅनुटली म्हणते घेऊन मला घ्यायला येते. घरात येते, आधी आईचा हात हातात घेऊन किस करते, नंतर शलाकाला दोन रोझेस देते. मग आम्ही दोघे अॉफिसला येतो. माझ्याकडे दोन मोठ्या गाड्या आहेत पण EPचा आग्रह मोडवत नाही. त्यातुन नॅन्सी म्हणजे आईची भलतीच लाडकी. तिच्या नवर्‍याला दर अधिक महिन्यांत घरी बोलावुन 'अधिकाचं वाण' द्यायच्या आमच्या आउसाहेब. माऊली एकुणच प्रेमळ. प्रत्येक वार एकेका देवाला वाटुन दिलेला. शनिवार शनीमहाराजांना देऊन बुधवार मारुतीला. अशीहि अॅडजेस्टमेंट आहे. दर शनिवारी नॅनुटली मधुन शनीमहाराजांच्या डोक्यावर तेल ओतायला जातात मातुश्री. हे चिडण्याचं कारण नव्हे.

P-Softचे दुसरा आधारस्तंभ म्हणजे 'जगन्या' हा मी हायर केलेला पहिला माणूस. तुला काय येत? या प्रश्नावर "थोडंसं COBOL आणि तुम्ही सांगाल ते" हे उत्तर मला जाम आवडलं. हा थोडासा नेपोलिअन टाईप ईसम आहे म्हणजे याच्या डिक्शनरीत 'अशक्य' हा शब्द नाहीये.
"सर, तुम्ही सांगताय ना मग हे काम होणारच". असला खाक्या.
हा दिवसभर बोलतो. अगदी त्याच्या लॅपटॉपशीही
." आता जरा MS Word ऊघड बघु, चला आता दोन ईमेल पाठवुन टाकू. जमेल ना?" असलं खुळंय. पण गंमत म्हणजे गेल्या महिन्यांत आमच्या कंपनी नेटवर्कवर व्हायरस अॅटॅक झाला तेंव्हा आमचे सगळ्यांचे मशीन्स झोपले फक्त जगन्याचा लॅपटॉप मात्र ठणठणीत.
"अरे त्याला वॉर्न केलं होतं. सगळे लुडकलेत' तूपण आडवा झालास तर वांदे होतील. तस्मात, जागा रहा. दिवस वैर्‍याचा आहे. ऐकलंन त्यानं" आहे काही उत्तर?
याला प्रॉब्लेम सांगा आणि वेळ द्या. हा सोल्यूशन देणारच. आई त्याला 'संकटमोचक हनुमान' म्हणते. एकदा इन्कमटॅकसची नोटिस आली. अकाउंटंट आणि फायनान्स हेड दोघांनाही प्रकरण आटपेना. मग 'संकटमोचक' गेले धावुन. दोन दिवस इन्कमटॅक्स अॉफिसमध्ये घालवुन प्रॉब्लेम सोडवुनच माघारी. यात नवल नाही. नवल तिसर्‍यादिवशी घडलं. तिसर्‍या दिवशी तो इन्कमटॅक्स कमिश्नर जगन्याला शोधत अॉफिसमध्ये.
 " काय रे? काय झालं आता?"
"काहि विशेष नाही. त्यालाच मदत पाहिजे. अँटीकरप्शनवाल्यांनी हेरलाय म्हणे त्याला. सोडव म्हणतोय." जगन्यादेखील चिडत नाही. राग आला कि मोठ्याने, हॉहॉ करुन हासतो तेवढा.
हेदेखील माझ्या चिडचिडीचं कारण नाहिये.

मी म्हणजे बन्या उर्फ गजानन कुलकर्णी. मी स्वतःला फास्टर फेणे उर्फ बन्या याचा प्रथमावतार समजतो. फाफे वाचल्यापासुन मी सर्वांना माझं नांव बन्या उर्फ गजानन असंच सांगत असे. आता ओरिजिनल बन्या करतो तसं म्हणजे मी चोरांना, स्मगलरांना पकडत नाही तर क्लाएंटना पकडतो. आमच्या अॉफिसात बन्या आणि जगन्याची जोडी फेमस आहे. जगन्या जॉईन झाल्यानंतरच्याच वर्षातली गोष्ट. रिलायन्सला आम्ही काही प्रोग्राम्स बनवुन दिले होते. त्याचं पेमेंट यायचं होतं. परांजप्यांनी कामगिरी माझ्यावर सोपवली. मी म्हटलं
" जगनला घेऊन जातो. त्यालाही शिकता येईल."
मी आणि जगन्या पोहोचलो. जगन्याला म्हटल
."मी यांचा VP भोजवानीला भिडतो. तु जरा आजुबाजुचं बघ." तो समजला.
सुमारे साडेतीन दिवस मी भोजवानींबरोबर होतो. या दरम्यान आम्हांला एकदोनदा 'The Great धीरुभाई' दिसले. भेटलो नाही पण मनोमन आदराने नमस्कार मात्र केला. साडेतीन दिवसांच्या तपश्चर्येनंतर भोजवानी प्रसन्न. फळ काय तर, मागच्या पेमेंटचा चेक, दिडकोटींची नवी अॉर्डर विथ अॅडव्हान्स पेमेंट. मी केबिनबाहेर आलो तर जगनमहाराज गायब. मी शोधत शोधत 'The Great धीरुभाईंच्या' केबिनपाशी आलो तर आतुन 'हॉहॉ' असा हसण्याचा आवाज. मी हे हसणं ओळखलं. मी घाबरलो. कारण हा चिडल्यावरच असा हसतो हे मला माहित होतं. क्षणाचाही विचार न करता मी दार ढकलुन आत घुसलो. तर समोर साक्षात 'The Great धीरुभाई' बसलेले आणि त्यांच्यासमोर आमचे ADM उर्फ जगनराव.
"बोलिये" 'The Great धीरुभाई'
" मेरे बॉस है। गजानन सर।" इति जगनराव
"अरे वा! आईये, बैठिये । आपकी तारीफ सुनी और आपको मिलने का सौभाग्य भी मिला । क्या बात है। 'The Great धीरुभाई'
" थँक्यु सर। मी
फार काहि बोललोच नाही. जगन्याला तिथुन बाहेर काढणं महत्वाचं होतं. आम्ही त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.
"काय दिवे लावलेत म्हाराज?"
"आज्ञापालन. तुम्हीच सांगितलं होतं ना 'आजूबाजूला बघ'. बघितलं".
"थेट 'The Great धीरुभाई' यांच्यापर्यंत?"
"सर, तुमच्याबरोबर राहिलो तर PM अॉफिसपर्यंत पण जाईन. शिकलोय तुमच्याकडुनच."
"हसत का होतास?"
जगन्याने उत्तर नाही दिलं.
 पण हे काय माझ्या चिडण्याचं कारण नाही.

आज सकाळची वेळ. मला स्टेपलर हवा होता. नेमकं गरजेच्या वेळेला गायब होण्याचा गुणधर्म असलेली ही एक वस्तु. केबिनबाहेर आलो तर सगळा स्टाफ सकाळच्या चहासाठी पँट्रीमध्ये गेलेला. आता कोणाचा तरी ड्राॅवर उचकला पाहिजे. आमच्या प्रथेनुसार कोणाच्याच ड्राॅवरला कुलुप नसतं. जगन्याच्या केबिनमध्ये घुसलो. पहिला ड्राॅवर उघडला. त्यात 'The Great धीरुभाई' यांचा फोटो फक्त. उजवीकडचा पहिला ड्रॉवर कुलुपबंद. दुर्‍यामध्ये स्टेपलर. काम झाल. पण तो ड्राॅवर बंद का? ध्यानात घ्या हे माझ्या चिडण्याचं कारण नाहिये.

थोड्या वेळानं जगन्या काही कामानिमित्त माझ्या केबिनमध्ये आला. ती चर्चा दोन तास चालली. मग आम्ही जेवणासाठी डबे उघडले. मी जेवतांना स्टेपलर शोधमोहिम सांगितली. जगन्याला विचारल कि
 "दोन गोष्टी सांग"
"'The Great धीरुभाई' यांचा फोटो का ठेवतोस आणि दुसरा ड्राॅवर बंद का?"
"हे ऐकायला आणि समजुन घ्यायला माझ्या केबिनमध्ये यावं लागेल."
आम्ही आता जगन्याच्या केबिनमध्ये.
"सर 'The Great धीरुभाई' म्हणजे माझ्यासाठी आदर्श. माणसं जोडायची कशी या कलेतले महागुरु. मी रोज त्यांचा फोटो पाहुनच दिवसाची सुरुवात करतो."
"What about the Locked one?"
" या सर. ईथं तुमचा फोटो आहे. बघा. मी माझ्या आईवडिलांकडुन, शिक्षकाकडुन जेवढं शिकलो त्यापेक्षा जास्त तुमच्याकडुन शिकलोय. म्हणुन ठेवलाय सर."
"This is crazy".
"क्रेझी नाही. I mean it Sir. तुम्हांला आठवतं आपण रिलायन्समध्ये गेलो होतो आणि 'The Great धीरुभाई' यांना भेटलो ते".
"हो चांगलंच आठवतंय"
"सर, तुम्हांला मी 'The Great धीरुभाई' यांच्यापर्यंत कसा पोहोचलो आणि आमचं काय बोलणं झालं हे सांगितलंच नाही."
" अरे हो रे. दिड कोटींच्या अॉर्डरच्या धुंदित मी पण विचारलंच नाहि. आणि विसरुन गेलो."
"सर, आपण तीन दिवस तिथं होतो. तुमच्या आदेशाप्रमाणे मी आजुबाजुचं बघत होतो, ओळखी करुन घेत होतो. चाणाक्ष आणि चौफेर नजर असलेल्या 'The Great धीरुभाई' यांच्या नजरेतुन आपला वावर सुटणं शक्यच नव्हतं. चौथ्या दिवशी दुपारी त्यांचा PA जो तोपर्यंत माझ्या चांगल्याच ओळखीचा झाला होता माझ्याकडे आला. तुला आंत बोलावलंय. मी याच संधीची वाट बघत होतो. मी आत गेलो. माझं दैवत मला दिसलं. मी हात जोडले. त्यांनी मला बसायला सांगितलं. चहा पाजला. काय कामासाठी आलोय हे विचारलं. मी सगळं खरंखरं सांगितलं. अगदी 'आजुबाजुला बघ' इथपर्यंत. तुमचीच शिकवण बिझनेसमध्ये Honesty pays you more than your expectations. फार खुष झाले. मला म्हणाले,
" तुम दोनोंकि जोडी कमाल की है। बहोत उँचाई छू लोगे तुम। अगर चाहते हो तो हमें जॉईन कर सकते हो। आजसे, अभी।"
यांवर मी हसलो आणि तुम्ही आंत आलात."

यांवर चिडायचं नाही तर काय?



श्रीकुल
5/9/2019

Disclaimer: या कथेमध्ये रिलायन्स आणि The Great धीरूभाई यांचे उल्लेख केवळ आदरापोटी आलेले आहेत. P-Soft technologies या नावाची कंपनी आढळल्यास केवळ योगायोग समजावा.



कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...