Sunday, 3 June 2018

एडिटिंग




एक वर्ष होऊन गेलं विजूमामा नाहिसा होऊन.

" प्रिय राधा,आयुष्याचा अर्थ शोधायला चाललोय, शोधू नका. "

तुझा अपराधी,
विजू

तेवढी बोटभर चिठ्ठी फक्त मागे. किती शोधलं आप्पांनी? अगदी बद्री, केदारला देखील जाऊन आले. पण नाही पत्ता लागला त्याचा. राधामामीचे वडिल म्हणजे पुण्यातले नामांकित शास्त्री. सरस्वतीचं वरदान पण लक्ष्मी कायम रूसलेली. आईमागे पोर वाढवली. तिला तिच्या घरी पाठवली की मी मोकळा , असं अनेकदा वाटे त्यांना. पॉलिसीच्या  निमित्ताने आमचे आप्पा भेटले. विषयांतुन विषय निघत गेला आणि गाडी शास्त्रीबुवांच्या मुलीच्या लग्नापर्यत आली. आप्पांनी स्वत:च्याच मेव्हण्याचं म्हणजे विजूमामाचं स्थळ सुचवलं. सदाशिवात भला मोठा वाडा, ऊरळीला पाण्याखालचा पन्नास एकरांचा सोन्याचा तुकडा, मुलगा एम.एस्सी. अजुन काय पाहिजे मुलीच्या बापाला खुष व्हायला. खर्चाची अडचण होती खरी पण मुलाकडून बोलणी करायला आमचे आप्पाच. त्यांनी घेतलं सगळं जुळवुन आणि एका शुभमुहूर्ती 'राधामामी' नांवाचा एक विलक्षण अध्याय सुरू झाला.

पण आरस्पानी सौंदर्याला काय शाप असतो कुणास ठाऊक? जन्मानंतर "आई' म्हणजे काय हे कळायच्या आतच तिचं छत्र गमावलं आणि संसार फुलतोय आता,  असं वाटायच्या आत नवरा नाहिसा झाला. कसला अर्थ शोधायचा होता त्याला? संसारात राहुन नसता का सापडला जीवनाचा अर्थ? असं विपरित घडावंच का माझ्याबाबतीत?

यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर ना राधामामीकडं होतं ना आई- आप्पांकडे. मुलीच्या दु:खाने शास्त्रीबुवा खचलेच आणि वर्षभरात ते देखील गेले. भगवंताला जाब विचारायला. अगदीच पोरक्या झालेल्या राधामामीच्या पाठिशी माझी आई अगदी खंबीरपणे उभी राहिली. आमचं धायरीतलं दोन खोल्यांचं घर सोडुन राधामामीच्या वाड्यात मुक्काम हलविला. आप्पांची एलायसी एजन्सी तशी रूटुखुटुच चालली होती. पीठ आहे तर मीठ नाही अशी अवस्था असायची अनेकदा. त्यातच सारखी घरं बदलायची कटकट. आईनं लोकं काय म्हणतील याची पर्वा न करता निर्णय घेतला. 

विजूमामाला सापडला किंवा नाही ते माहित नाही पण मी वाड्यात रहायला गेल्यापासून राधा मामीला मात्र जीवनाचा‌ अर्थ सापडला असावा. न लाभलेल्या मातृत्वाची कसर तिनं माझ्यावर अपार माया करून भरून काढायला सुरुवात केली. माझी शाळा, दप्तर, अभ्यास, तबल्याचा क्लास सगळं अगदी ताब्यातच घेतलं तिनं. आई तर म्हणायची सुध्दा
" राधे, कधी कधी कळतंच नाही किंवा चंद्रू माझा मुलगा आहे की तुझा? किती माया लावतेस गं ?"

या विलक्षण प्रेमाबरोबरच आणखी एक गोष्ट राधामामीकडं होती आणि ती म्हणजे तिला शेकडो गोष्टी पाठ होत्या. पुराणातल्या, वेदांतल्या, इतिहासातल्या, महापुरूषांच्या अशा गोष्टींचा खजिना होता तिच्याकडे.तिच्या नेहमीच्या बोलण्यातदेखील सतत असे पुराणात ले नाहितर वेदातले दाखले असायचे. सूर्यनमस्कार, अभ्यास आणि तबल्याचा रियाझ या तीन गोष्टी मी पुर्ण केल्या तरच ती नवी गोष्ट सांगायची.

राधामामीच्या गोष्टी ऐकता ऐकता दिवस भरभर जात होते. विजू मामाचा अजुन पत्ता नव्हता. आई-आप्पांनी कितीतरी वेळा राधा मामीला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं.  पण तीनं प्रत्येक वेळेला स्पष्ट नकार दिला. एकदा तर आई हटुनच बसली," राधे, तू हो म्हणत नाहीस तोवर मी अन्न-पाणी घेणारच नाही."
संध्याकाळपर्यंत राधामामीनं वाट पाहिली. संध्याकाळी ताट वाढुन आईसमोर गेली आणि म्हणाली,
" आक्का, म्हणजे लढाईला गेलेला वाली परत येणार नाही म्हणुन तारेनं दुसरा नवरा स्विकारला. तसंच ना? आणि माझा नवरा परत आल्यावर माझी सुटका करणारा 'प्रभू राम' कुठून आणायचा? माझा नवरा काहितरी शोधायला गेलाय, मला टांकुन गेला नाही."
"आता प्रत्येक स्त्रीनं स्वता:च 'रामरूप' धारण करायला नको का?"
" पोरी, कुठून आणलंस गं हे शहाणपण आणि त्या नतद्रष्टाला का नाही दिसलं म्हणते मी?"
दोघी गळ्यांतगळे घालून रडल्या. नंतर हा विषय कायमचाच थांबला.

विषय थांबला पण काळ पुढे जातच रहातो. माझं इंजिनिअरिंग चालू होतं आणि आप्पांना ' बेस्ट परफॉर्मर' अॅवॉर्ड मिळालं. बक्षिस म्हणुन एक कॉंम्प्युटर मिळाला. त्या कॉंम्प्युटरनं मला वेडं केलं. दिवस-रात्र त्यांच्याशी खेळणं सुरु झालं. विशेषतः फोटोशॉप मध्येतर मी अगदीच 'किडा' झालो. शेकड्यांनी फोटो अल्बमस आणि वेडिंग व्हिडिओ मी एडिट करून दिले. माझं असं चालू असतानाच आप्पांना ' खंबाटा' भेटला. हा टिपिकल 'पारसी बाबाजी' FTII मध्ये एडिटिंग डिपार्टमेंटचा हेड अॉफ द डिपार्टमेंट होता. त्यानं माझं फोटोशॉपचं वेड बघितलं आणि मला एडिटिंगचा कोर्स करायला सांगितला. एन्ट्रन्स पास करणं मला जड गेलं नाही. मी रीतसर FTII मध्ये दाखल झालो आणि पुढची दोन वर्षे अक्षरशः धुंदीत गेली. ' खंबाटा' सारखा चक्रम पण अफाट ज्ञानी शिक्षक आणि माझ्यासारखा चिकट विद्यार्थी. आमचं चांगलंच जमलं. 'खंबाटा'ने हातचं काहिही राखुन न ठेवता मुक्तपणे आम्हांला वाटुन टाकलं.

"हे तुझं एडिटिंग नक्की काय असतं रे, चंद्रू?" आईचा प्रश्र्न.

"अगं, फिल्म करतांना ना, खूप जास्तीचं शूटिंग करून ठेवतात. आपण कुठं एवढी सगळी फिल्म बघणार? मग एडिटर काय करतो कि त्या सगळ्या फाफटपसाऱ्यातुन आवश्यक तेवढा आणि कथेशी सुसंगत भागच जोडतो. आणि मग आपण पहातो तो पिक्चर तयार होतो. अगदी सुटसुटीत. कधीकधी तर मूळ फिल्म इतकी बेंगरूळ असते कि  बघवत पण नाही.  पण काही अगदी पोचलेले एडिटर्स असतात ना,  ते अशी  काही कात्री चालवतात ना की अगदी सुंदर फायनल प्रिंट येते." मला जमेल तसं सांगितलं.

"अय्या , म्हणजे पुराणकालीन ऋषी जसे कायापालट करायचे तसंच ना?" राधा मामीचा पुराणकालीन दाखला.

आम्ही शेवटच्या सेमिस्टरचा प्रोजेक्ट करण्यांत बिझी होतो. एके दिवशी 'खंबाटा' एका पाहुण्याला घेऊन लॅबमध्ये शिरला.
" Students, I am happy to introduce you to my friend Andre"
'आंद्रे लेरू', आणि पुण्यांत?

आम्ही अक्षरशः वेडे झालो. आंद्रे म्हणजे हॉलिवूडमधलं बडं प्रस्थ. तीन अॅकॅडमी आणि सात गोल्डन ग्लोब जिंकणारा 'आंद्रे लेरू'. त्याला नुसतं पाहाणं हाच एक दिव्य अनुभव होता. सहा फूट उंची, सोनेरी कुरळे केस आणि ग्रीक देवते सारखा दिसणारा 'आंद्रे लेरू' हा नितांत देखणा, टिपिकल फ्रेंचमन होता.
पुढचे तीन दिवस आम्ही झोपलोच नाही. अलेक्झांडरच्या मोहिमेवर आधारित एक एपिक 'आंद्रे' निर्माण करणार होता. त्यासाठी काही संदर्भ आणि जमलंच तर काही माणसं शोधायला तो भारतात आला होता. तो विद्यार्थी असल्यापासून 'खंबाटा'ला ओळखायचा. म्हणुन त्याला भेटायला पुण्यात.
' खंबाटा' सारखा जातिवंत मास्तर ही संधी कशाला सोडतोय. त्यानं आम्हां सर्वांना आपापले प्रोजेक्ट्स
' आंद्रे'ला दाखवायला सांगितले.
माझा प्रोजेक्ट पाहुन 'आंद्रे' भलताच खुश झाला. त्यानं सरळ मला त्यांच्याबरोबर काम करणार का असं विचारलं. माझी वाचाच बसलेली. माझ्या वतीने ' खंबाटा'च बोलला.
"He will come, only if you pay him handsomely and make arrangements  for his accommodation there"

'आंद्रे'नं या किरकोळ अटी मान्य केल्या आणि परत गेल्यावर पेपर्स पाठवतो असं सांगितलं.

अस्मादिक हवेत तरंगत घरी गेले. घरी सांगितलं. 

' आंद्रे'चं नांव ऐकून राधामामी म्हणाली,
"कसं नांव आहे ना? इंद्रा सारखं वाटतंय."

आंद्रे'कडुन पेपर्स आले आणि माझी तयारी चालू झाली. आम्ही असेच माझ्या हॉलिवूड पदार्पण, अमेरिका तिथलं वातावरण याविषयी बोलताना होतो. तर आई एकदम म्हणाली,
" चंद्रू , तुझ्याबरोबर राधेला घेऊन जा"
मी ऐकुन न ऐकल्यासारखं केलं पण आप्पांनी मात्र मनावरच घेतलं आणि राधामामीसाठी पासपोर्ट आणि टूरिस्ट व्हिसा करूनच आणला.

आम्ही दोघं ग्लेनडेल गावी पोहोचलो. आंद्रेच्या सांगण्यावरून ' युनिव्हर्सल स्टुडिओ' नं मला एक छोटं अपार्टमेंट दिलं होतं. मी आणि राधामामीनं तिथं डेरा जमवला. एरव्ही पुण्याबाहेर पण क्वचितच गेलेल्या राधामामीनं नव्या गावाशी आणि वातावरणाशी झक्क जुळवुन घेतलं. अगदी ग्लेनडेलच्या मार्केटमधुन नेहमीचं गिर्हाईक असल्यासारखी शॉपिंग करायला लागली.

माझं काम व्यवस्थित चालू होतं. युनिव्हर्सलच्या या प्रोजेक्टसाठी अगदी जगभरातील कलाकार, तंत्रज्ञ आणले होते. अनेक भाषा बोलणारे, वेगवेगळ्या रंगांचे अनेक लोक तिथं होते. पण 'आंद्रे'ची आखणी आणि शिस्त वाखाणण्याजोगी होती. 'सिमोन', सिमोन वॉलेस सोडून कोणालाच मोकळीक अशी नव्हती. विलक्षण देखणी         ' सिमोन' प्रोजेक्टमध्ये नसुनही अगदी तोऱ्यात वाव रयची. आता खुद्द ' आंद्रे' ची गर्लफ्रेंड आणि आख्खं हॉलिवूड जिच्यासाठी पागल होतं तिचा इतका तोरा असणारच ना.

एक शेड्यूल जरा लवकर संपलं. त्यादिवशी 'आंद्रे'नं डिनर पार्टी अनाऊन्स केली. आम्ही सगळ्यांनी 'ट्रॅडिशनल' ड्रेसकोड ठरवला. मी घरी आलो. राधा मामीला पार्टिचं सांगितलं आणि सहजच विचारलं किंवा "येतेस. का तू?"
तर चक्क "हो" म्हणाली. 
मी 'आंद्रे'ला मेसेज टाकुन, गेस्ट आणता येईल का ते विचारलं. तर तोही हो म्हणाला.
" राधा मामी, चल आटप लवकर. इथं वेळेवर जावं लागतं."
"आलेच" म्हणुन ती आवरायला गेली ती चक्क 'नऊवारी पैठणी' नेसूनच आली. काय दिसतं होती! देवघरातल्या समईसारखा तिचा चेहरा अधिकच खुलून दिसत होता. जणू तिच्याच कथेतील पुराणकालीन देवता.
" चक्क पैठणी? कुठून आणलीस?"
"आक्कांनीच आणली होती. बळेच बॅगेत भरली".

आम्ही वैळेआधीच पोहोचलो. प्रत्येकजण राधामामीकडे टक लावून बघत होता. 'आंद्रे' आला बरोबर लावण्यवती
 ' सिमोन' होतीच. एकेकाशी बोलत आमच्याकडे आला. त्यानं राधा मामीला बघितलं आणि बघतच राहिला.
" She is so beautiful!"
पूर्णवेळ तो आमच्या पासुन हललाच नाही. तो स्वत: त्यांच्या गाडीने सोडायला घरापर्यंत आला. त्यानंतर नेहमी येतच गेला. 

मला कळेचना किंवा हा असा का वागतोय? मी जरी बुद्दू असलो तरी सिमोन चतुर होती. तीनं आंद्रेच्या मागे लग्नाचा लकडाच लावला. त्या दोघांची या विषयावरची बोलणी आमच्याच लॅबमध्ये चालत. कधीकधी त्यांची भांडणंही होतं. पण आंद्रे तिला काही केल्या होकार देत नव्हता.

एके दिवशी आम्ही असेच कामात मग्न होतो. सिमोन तिथेच होती. फारच अस्वस्थ दिसत होती. एवढ्यात दार ढकलून आंद्रे आला. आधीच गोरापान असलेला आंद्रे अगदी लालबुंद दिसत  होता आणि थोडासा लंगडत पण होता. त्यानं सिमोनला पाहिलं आणि तिच्यापुढे जाऊन गुढघ्यावर बसला आणि तिच्या नजरेला नजर भिडली विचारलं,
'Will you marry me?'

सिमोनला आपल्या कानांवर विश्वासच बसेना. 'येस' असं किंचाळून ती रडायलाच लागली आणि बाकी सगळे हसायला.

पुढच्याच रविवारी, मी आणि राधा मामी , आंद्रे आणि सिमोनचं लग्न आटोपुन घरी परत आलो.

' छान झालं ना लग्न? पण मला कळत नाही कि आंद्रे असा बदलला कसा?' मी
' चंद्रू, बैस तुला गोष्ट सांगते'
'आं!आज अचानक गोष्टींचा मूड? गृहपाठ नाही केला मी आज'.
' नाठाळपणा पुरे तुझा. बस इथे.'
माझी काय हिंमत नाही म्हणायची.
' तुला अहल्या आठवते का रे? गौतम ॠषींची पत्नी?'
' तर, गौतम ॠषी तर नाहीतच पण अहल्येपाशी कोणीच नाही हे पाहून इंद्र अहल्येच्या दारी आला आणि त्यानं चक्क  तिला मागणीच घातली. अहल्येनं त्याला अर्थात नकारच दिला. गौतमावर आपलं प्रेम असल्याचं सांगितलं आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही ती विचारच करू शकत नसल्याचं स्पष्ट केलं. पण ईंद्र हट्टालाच पेटला. तो ऐकेचना. मग अहल्येनं इंद्राचे गाल रंगवुन काढले आणि तिच्यापुढे वाकलेल्या इंद्राच्या गुढघ्यावर सणसणीत लाथा घातल्या. अहल्येच्या दुर्गावताराने घाबरलेला इंद्र पळून गेला मग.'

'म्हणजे, तू आंद्रेला? आंद्रेनं तुला......

तेवढ्यात फोन किणकिणला. आई होती.
' अरे कुठे आहेस तू? राधा कुठंय? कशी आहे ती?'
'आई, राधा मामी एडिटर झाली एडिटर! आख्ख्या माणसाचा कायापालट केलाय तिनं'.

कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...