Monday, 9 July 2018

पडवळ


पडवळ

मन्याकाका पडवळ गेला.

खरीच होती बातमी. शंकाच नको. मी नगरला ऑपरेशन्स करायला दर शुक्रवारी जातो, तसा यावेळी पण पोहोचलो. डॉ.दात्यांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतो ना पोहोचतो तोच निरुचा फोन आला.
"दादा, लवकर नीघ. बाबा गेले".
"आं! कसं काय अरे काल रात्रीच बोललो मी, तेंव्हा ठीक होता ना रे तो. असं अचानक काय झालं?"
"सकाळी ठीक होते. शेतावर जाऊन आले आणि जरा पडतो म्हणाले.आम्हांला विचित्रच वाटलं. म्हणुन विचारायला गेलो तोपर्यंत शांत झाले."

ऑपरेशन्स रद्द केली आणि तडक वाडीला, अटकरवाडीला निघालो. नगरहून कोपरगाव मार्गे दोन तासांचा तर प्रवास पण फार लांबचा वाटायला लागला.

मन्याकाकाच्या ओढीनं हा प्रवास शेकडो वेळा केलेला. लहानपणी तर कोपरगावपर्यंत एसटी आणि तिथुन पुढं कधी पायी तर कधी बैलगाडीने. कधीकधी आधी कळवलं असलं तर मन्याकाका फटफटी घेऊन न्यायला यायचा. एकदा वाडीवर मळ्यात पोहोचलो कि थेट विहिरीवर पोहायला. मन्याकाका म्हणजे 'काका, गुरू, मित्र, थोरला भाऊ' असं टोटल पॅकेज होता माझ्यासाठी. तसा तो आमच्या दादांचा सख्खा मावसभाऊ. त्याची आई, मथुमावशी ही माझी मावसआजी. काय प्रेमळ होती. आजही एखाद्या हुरहुरत्या क्षणी मावशी आजीचा सायीसारखा मऊ हात आठवतो, तिनं मायेनं दिलेले एक पैसा, दोन‌पैशाची नाणी आठवतात. गहिवरायला होतं. नवऱ्याच्यामाघारी तिनं अटकरवाडीसारख्या छोट्या गांवढ्यात राहून खंबीरपणे शेती आणि मुलगा दोन्ही अतिशय व्यवस्थित सांभाळलं. 
त्याचं खरं आडनाव देशपांडे. पण मन्याकाकाला सगळे 'मन्याकाका पडवळ' म्हणायचे. त्यातलं 'काका' हे विशेषण माझ्यामुळे चिकटलं. तसा तो माझ्यापेक्षा साताठ वर्षांनीच मोठा होता,पण 'काका' होता ना. मी लहानपणी सारखा त्याच्यामागे काका,काका करून हिंडत असे. त्यामुळे सुरूवातीला गंमतीने आजूबाजूचे पण त्याला मन्याकाका म्हणायला लागले, नंतर तेच कायम झालं.

पण त्याचं 'पडवळ' हे उप-आडनांव मात्र त्यानं स्वकर्तृत्वानं मिळवलं होतं.त्यामागे जरा गंमतच आहे.
आमची मथुआजी देवदेव फार करायची. गौरी-गणपती तर फारच निष्ठेने साजरे व्हायचे. तिच्याकडच्या गौरी काय सात्त्विक दिसत म्हणुन सांगू? रात्री समईच्या मंद प्रकाशात त्या गौरींच्या मुखवट्यांवर असं तेज विलसत असायचं कि वाटायचं माहेरी आलेल्या माहेरवाशीणीच जणू. मन्याकाका लहान होता त्यावेळची गोष्ट. असा गौरी-गणपतीचा सण होता आणि त्यादिवशी गौरी जेवणार होत्या. तो चारी ठाव स्वैपाक करण्यात मथुआजी गर्क होती, तेवढ्यात तासभर पोहून मन्याकाका घरी आला आणि भूक-भूक करायला लागला. पण त्यादिवशी तर गौरी जेवल्याशिवाय घरच्यांची जेवणं कशी होणार? मग मथुआजीनं त्याला कुठंतरी गुंतवायचं म्हणुन  म्हटलं कि, "मन्या, जरा मला पडवळाचे काप करून देतोस का रे बाळा? आजच्या‌ दिवशी लागतात रे".
"पडवळ?" शी! कसली गिळगिळीत असतात. मी हात पण लावणार नाही त्यांना".
आधीच तो सोवळ्यातल्या स्वैपाकाचा धबडगा आणि चुलीच्या धुराने मथुआजी कावली होतीच त्यात मन्याकाकाच्या धुत्काराची भर पडली. मथुआजीनं हाताला लागलेली पळी उचलली आणि मन्याकाकाला फेकून मारली. मन्याकाकानं ती चुकवली पण पडवळावरून आई आपल्याला रागावली हे मात्र त्याला लागलं. ती पळी मथुआजीला परत देत तो तिला म्हणाला, "आई, तू पडवळावरून मला रागावलीस ना? तर ऐक आता, मी आजपासून रोज पडवळाची भाजी खाणार". झालं. मन्याकाका व्यसन असावं तसं रोज पडवळ खायला लागला. कॉलेज साठी कोपरगांवला गेलेल्या मन्याकाकाला रोज वाडीवरून घरचा डबा जायचा. अगदी पडवळाच्या भाजीसकट. आधी तो 'मन्याकाका' होताच आता या पडवळाच्या भीष्मप्रतिज्ञेमुळे सगळे त्याला 'पडवळ' म्हणायला लागले.

पण एकूणातच मन्याकाका असा मुलखावेगळा वागायचा. चांगली मेडिकल साठी बी जे ला अॅडमिशन मिळालेली पण 'म्हातारी' एकटी पडेल म्हणुन मेडिकल सोडुन कॉमर्सची वाट धरली. ग्रॅज्युएशन झाल्यावर थेट वाडीला शेती करायला दाखल. शेतीतही नवीन प्रयोग चालूच. एकदा भेळीच्या कि भज्यांना गुंडाळून आलेला कागदावर ईस्राईलमधील प्रगत शेतीवर लेख होता. झालं, याला आता ईस्राइलनं झपाटलं. त्याकाळात आजसारखी साधनं नव्हती त्यामुळे माहिती मिळवायची कशी आणि कुठून हा प्रश्नच होता. तर हिकमती मन्याकाकानं त्यावरही तोडगा शोधलाच. त्यानं थेट 'Hon. Prime Minister, Israel, Tel Aviv' या पत्त्यावरच पत्र पाठवुन, त्यांनाच माहिती देण्याची विनंती केली. बऱ्याच दिवसांनी मन्याकाकाच्या नावाने एक भलंमोठं पार्सल आलं. इस्राएलच्या पंतप्रधानांकडून. त्यात एक कौतुकाचं पत्र्, अनेक माहितीपत्रके आणि अत्यंत अनमोल अशी अनेक बियाणं होती. ते पाहुन मन्याकाकाला शंभर हत्तींचे बळ आलं. झपाटल्यागत तो शेतात राबत होताच त्यात आता या नव्या ज्ञानाची आणि बियाणांची भर पडली. 'बामनाचा मळा' आता अधिक पिकायला लागला. 

पुढं लग्नाची वेळ आल्यावर त्यानं अनेक सधन बापांच्या मुली नाकारून शेतीची आवड असलेल्या शेवडे गुरुजींच्या नलिनीला पसंत केलं. नलिनी काकू आणि मन्याकाका असं जोडपं क्वचितच बघायला मिळतं. दोघंही खप्ये. कष्टाच्या वेळी कष्ट करणार, जरासुद्धा हयगय नाही. गड्यानं जरा कामचुकारपणा केला तर रागे भरायला मागेपुढे पाहणार नाही पण त्याच गड्याला दुखलं-खुपलं तर त्याचे आई-बाप काय करतील इतकं करणार. लग्नानंतरच्या पहिल्या श्रावणांत काकूला माहेरची सय यायला लागली, तर मन्याकाका म्हणाला ,"तुला येते तशी तुझ्या आईला पण तिच्या माहेरची आठवण येतच असेल कि. आता शेतीच्या कामांत खोळंबा होईल तू गेलीस तर. त्यापेक्षा तिलाच बोलावुन घे इकडं. करा नागपंचमी आणि मंगळागौर इकडंच. तूच तुझ्या आईचं माहेरपण कर".

असलं विचित्रपण सोबत घेऊन काकूंनी संसार केला.

'नीरु ' सारखा गुणवान मुलगा आहे, आयुष्यभर राबुन पिकता ठेवलेला 'बामनाचा मळा' आहे, नलिनी काकू सारखी आदर्श सहचारिणी आहे. या अतीव समाधानाने मन्याकाका संपन्न आयुष्य जगून आपली इहलोकीची यात्रा संपवता झाला.

दु:ख तर अपार झालंय. पण त्याला अभिमानाची किनार आहे. असा लोकविलक्षण माणूस आपला सगासोयरा आहे आणि त्याचं ते मनापासुनचं धडपडणं आपल्याला अनुभवता आलं आणि काही अंशी का होईना आपल्या परीनं आपल्या आयुष्यात पेरता आलं याचं सुख पण होतं. बाहेर लोकांची अफाट गर्दी होती, पण मन्याकाकांची शिस्त आणि धाक अजुन होता म्हणुन कि काय कुठलाही गोंगाट नव्हता.

दु:खाचे कढ आवरून आम्ही पुढच्या तयारीला लागणार ,तेवढ्यात दारासमोर दोन मोठ्या गाड्या थांबल्या. त्यातुन दोन अगदी दिसताक्षणी सधन वाटावीत अशी कुटुंबं उतरली. त्यातले दोघे म्हातारे कसंबसं रडू आवरत मन्याकाकाच्या पार्थिवापर्यंत पोहोचले आणि त्यांनी स्वत:ला त्याच्या पायावर अक्षरशः झोकुन दिलं आणि मोठ्यानं गळा काढत त्यांच्या भावनांना वाट करून दिली. कोण होते ते? मी नीरूकडे बघितलं तर तो माहिती नाही अशा अर्थानं मान हलवत होता. थोड्यावेळाने त्यातल्या एका म्हाताऱ्यानं पिशवितून एक रेशमी महावस्त्र काढलं आणि त्या दोघांनी मन्याकाकाच्या देहावर पांघरलं. एक जण तिथंच बसला आणि दुसरा हळूहळू चालत नीरुपाशी गेला.

"निरुदादा, लई वाईट झालं बघ. असला जंक्शन मानूस बघायलाबी भेटायचा न्हाई. लई भारी होता तुझा बाप. आता जप सोताला". नंतर तो माझ्याकडे आला.
" शिरूदादा न्हवं? म्हंजी डाक्टर  शिरुच ना?"
मी मान हलवली. "पण मी ओळखलं नाही आपल्याला".
"न्हाईच वळकायचा तू ". फकस्त ह्योच वळखुन व्हता आमाला." त्यानं मन्याकाकाच्या पार्थिवाकडे बोट दाखवून म्हणाला.
" मी सखाराम, अन् त्यो धोंडिबा. हितुन पाच कोसावर आमचं गाव".
" पण पाहिलं नाही कधी तुम्हांला याआधी".
"आरं, बघनार कधी? दुसरीच खेप आमची. पैल्याच टायमाला मन्याबामनानं हग्या दम दिलता का पुना हिकडं तडमडाचं ते माझ्या धेहावर चादर टाकायलाच".

"पण कशाला आणि कधी आला होतात तुम्ही?".

"ती बी लई मोठी ष्टोरीच हाय. भात्तर सालच्या दुस्काळातली. आभाळ रूसल्यालं, घरात खायला दाना न्हाई आन् खिशात दिडक्यांचा पत्त्या न्हाई. आयबाप म्हातारं झाल्यालं आन् पोरंबाळं बारकी. कमावनारी दोगच, मी आनी बायकू. खानारी तोंडं धा. कुठं रोजंदारीवर मिळेल तितं जायचं आन् मिळालेल्या मजुरीतनं मिळंल तितनं धान्य आनायचं. पन त्ये बी मिळेना झालं. फाकं पडाय लागलं. धोंडिबाच्याकडंपन ह्येच हाल. पीट हाय तर मीठ न्हाई आन् मीठ असलं तर पीट संपल्यालं. नशिबाचा भोग निस्ता. काय करावं त्येच सुदरंना. पोट खपाटीला गेलेले आई-बाप, भुकेनं तोंड बारकी झालेली पोरं पघुन जीव लयी पाळायचा”.

“ एक दिस धोंड्यान आन मी ठरिवल का कायबी करायचं पण ल्येकारास्नी उपाशी न्हायी ठीवायाच. ‘बामनाचा मळा’ ठाव व्हता. मन्या बामन पैका बाळगून व्हता याची खबर व्हती. आमाला पैका नकू व्हता, खायला धान्य पाहिजे व्हत. मन घट केलं आणि ठरिवल का मन्या बामनाला लुटायचा. सगळी खबर काढली. काकी न्येमकी कुडतरी बाहीर्गावी ग्येलेली. सांजच्या टायमाला समद गडी-मानस ग्येल्यावर मन्याबामन एकलाच रहातो. त्याच टायमाला त्याला झडपायचा. ठरल्यापरमान आमी येळ सादली. काळोखातच मन्याकाकावर घोंगड टाकल आणि लयी हानला. पण मन्याकाका आयकतो व्हय. आमाला दोगाना बी आटपना. संदी सादून त्यो सटकला. धोंड्याच्या त्वान्डावर जोराचा फटका हानला तर त्याच दातच पडल. त्वांड धरून धोंड्या बोंबलत खाली पडला. मंग मान्याकाका माह्याकड वळला. मला धरून लयी धुतला त्यान. तीन दिस पोटात आन्न नाही. कसलं बळ आसनार आमच्या अंगात. समोर तर ह्यो आडदांड गडी. मी खाली पडल्यावर त्यान खुंटीच दावं काढलं आनी दोघास्नी बांधून घालून सोता घरात निघून ग्येला. रातभर आमी विवळत पडल्यालो”.
“ सकाळच्या पारी मान्याकाका बाहीर आला. दावं सोडलं आनी आमास्नी प्याया पाणी दिल आणि थोडी भाकर दिली. भाकर खाऊन झाल्यावर पुन्ना करकचून बांदून ठिवल आणि फटफटीला किक मारून कुडतरी ग्येला. आमचा ख्येळ संपला. आता ह्यो पोलिसाना घ्येऊन येनार आनी पोलीस आमची वरात काडनार. आमी नशिबाला दोष देत बसल्यालो. हालता बी येत नव्हत. थोड्या टायमानी पुन्यांदा फटफटीचा आवाज याया लागला. म्हनलं आता आपले दिस भरले. पन मन्याकाका येकलाच आलेला. पिशवीतून औशीद काडल. दावं सोडून आमास्नी मोकळ क्येलं. औशीद लावलं. भरपेट खायाला दिल. म्हणाला कशापायी चोऱ्या करून राहिले? आमी आमची चित्तरकथा सांगितली. आमी काय चोर न्ह्यायी पन परीस्तीती भाग पाड्तीया. घरात खायला दाना न्हायी आणि उपाशी पोर-बाळ कशी पघायाची.

“ तसा मान्याबामन उटला आणि घरात ग्येला. घरातून दोन पिशव्या आनल्या. त्यात दोन-दोन पायली धान्या वतलं आणि आमास्नी दिल्या. खिश्यात हात घातला आनी लायी आजीब क्येलं. दोन हज्जार काडले आणि आमास्नी दिले.

“ आजपासून चोऱ्या करायच्या नाहीत. हे पैसे दिलेत त्यातून धंदा चालू करा. काय जमत तुम्हाला?”
“ मला फकस्त लयीभारी चा बनिवता येतो.” धोंड्या बोल्ला
“ मग तू चहाची गाडी टाक. आणि तुला रे?”
“ मला काय बी येत नाय. पन कारभारीन लायी भारी भजी बनीवती”.
“ मग तू भज्यांची गाडी सुरु कर. कोपरगावला सुरु करा. हे पैसे तुम्हाला बक्षीस. परत द्यायचं नाव काढलं तर पुन्हा मारीन. आणि हो, पैसे उडविलेत तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही हे लक्षात ठेवा. मी वेळोवेळी येऊन लक्ष ठेविनच”.


“ शिरुदादा, आमाला तर द्येवच भेटला बघ. काय कराय आल्तो आन काय घडलं बघ.”

मंग आमी आमच्या गाड्या चालू केल्या. धोंड्यान तर गाडीवर ‘बामनाचा चहा’ म्हणूनच पाटी लावली. लयी फेमस जाला त्यो. पन माज काय बस्तान बसना. मंग एक डाव मन्याबामन आला होता त्याला म्हणल का इथ काय चालना माज. तर त्यो म्हनाला का तू इथून उठ आणि शिर्डीला जा. तिथं लयी डिमांड हाये. उठलो आणि शिर्डीला ग्येलो. साईबाबाच पावलं बग. लयी जोरात चालाय लागली आमची ‘काकाची मिसळ’.

“ आता धोंड्याची दोन हाटेल आणि एक स्टोर हाये. माज एक लाजिंग, बोर्डिंग आणि काकाची मिसळ हाये. लयी झकास चाललंय आमच.”
“ मान्याबाम्नाकड चोरी करायची बुद्धी ज्या भगवंतान दिली त्याच लयी आभार बाबा”.

सखाराम बोलायचा थांबला. त्याच्या गळ्यातून शब्दच उमटेनात. गळा भरून आलेला आणि डोळ्यातून अखंड अश्रुधारा चालू. आम्हाला हे काही ठाऊकच नव्हत. मन्याकाका कधीच चकार शब्द देखील बोलला नव्हता. इतकी निशब्द कृती मन्याकाकाच करू जाणे.

रस, रूप, गंध आणि चवहीन असलेल्या ‘पडवळ’ नावाच्या भाजीच नाव घेऊन जगलेला हा माणूस वास्तवात इतका गोडवा निर्माण करू शकतो? आईला दिलेल्या वाचनाला जागून आयुष्यभर पडवळ खाल्लेला माणूस स्वतः मात्र अतिशय रुचीसंपन्न आयुष्य जगला. आजवर त्याला ‘मन्याकाका’ म्हणून नमस्कार केला पण आता हा शेवटचा नमस्कार मात्र त्या
‘गोड पडवळाला’.

श्रीकुल.




5 comments:

  1. Oghavti aani nemki sundar bhasha .. aani .. baki kaay bolu !!

    ReplyDelete
  2. सुरेखच श्रीकुल !

    ReplyDelete
  3. छान जमलयं, पडवळाच कालवन! 🙏🙏🙏🐢🐢

    ReplyDelete
  4. सुरेख... यावर मन्याकाका ला समर्पित ... या 2 ओळी

    *कीसी की गलती ढूंढ लेना बडी बात नही*...........


    *उसको बिना बताए गलती सुधार लेना बहुत बडी बात है*

    🌹🙏🏻🌹

    ReplyDelete

कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...