Saturday, 26 January 2019

गणतंत्र

गणतंत्र


ज्यानेवारी म्हणजे कैलासावर अपार थंडी. अगदी दुपारीदेखील सोमरस प्राशन केल्याशिवाय अंगात ऊब येत नाही. पण त्याचा देखील एक फायदा आहे, आमचे सोमरस पानाने लालजर्द झालेले नेत्रकमल (काहिही हं श्री) पाहुन कोणीही आमच्याशी स्वताहुन बोलायला येत नाही. त्यामुळे आमचे परमविद्वान मित्र कृष्ण द्वैपायन व्यास (यांना आम्ही प्रेमाने के. डी. म्हणतो) यांनी आमच्या अफाट आचरटपणाला आवर घालण्यासाठी सुचविलेले मौनव्रत आपोआपच घडते. त्याकारणे कैलासावर सर्वत्र शांतता असते. नाही म्हणायला पार्वतीवैनी चिडचिड करत असतात.पण आमच्यासारख्या भक्तगणांना तासातासाला गरमागरम चहा करून पाजायचा म्हटल्यावर त्या माऊलीची चिडचिड होणारच ना.

तर, अशीच एक सोमरस कृपेने ऊबदार सकाळ होती. पार्वतीवैनींनी भरल्या पहाटेच (साडेनऊ वाजता) त्यांची प्रसिध्द भूपाळी म्हणजे
'श्रीखूळ भावजी उठा आता,
उन्हं तापायला लागली तरी
लोळतांय काय गाढवासारखे',
ही गाऊन आम्हांला जागृत अवस्थेत आणले होते. केवळ दोनच कप चहा घेऊनआणि केवळ उबेसाठी म्हणून (किती उदात्त कारण!) सोमरसाचा साठा थोडा हलका करून आम्ही उन खात बसलो होतो. तेवढ्यात शंकर अण्णांचा आवाज आला. आम्ही नाही म्हटलं तरी अंमळ गुंगीतच होतो.
"रामराम आण्णा" आम्ही
"खूळ्या, लोळतोयेस काय. कामं नाहीत का.सगळे भूतगण कुठं गेले?" आण्णा.
" आण्णा, आज सुट्टी. सव्वीस ज्यानेवारी आज."
" मग काय झालं? कुणाची जयंती का पुण्यतिथी?"
" न्हाई, तसं न्हवं, पन् गनतंत्र दिस हाय न्हवं आज"
"आधी तू  त्या कोल्हापूर स्पेशल मालिका बघणं बंद कर. खुळ्या, किडमिड्या स्वत:ला काय राणादा समजतो का काय? आणि हे गणतंत्र म्हणजे काय?"
अण्णांचा गोळीबंद सवाल.
आमची बत्ती गुल. गणतंत्र म्हणजे काय सांगावं याचा विचार करून तंतरलो. नागरिकशास्त्र हा विषय केवळ दहा मार्कांचा असल्याने आम्ही ओप्शनला टाकलेला.
" गणतंत्र दिवस म्हणजे, ......म्हणजे असं असतं" आम्ही
"अडखळतोस काय? उतरली नाही का?"
" हां, (युरेका, युरेका) गणतंत्र म्हणजे सुट्टी असते आण्णा." आम्ही.
" तेच तर विचारतोय. म्हाईत नाही तर विचारून सांग."

कोणाला बरं विचारावं? आम्ही त्वरित आमचे परमविद्वान मित्र कृष्ण द्वैपायन व्यास उर्फ केडी यांनाच फोन लावला. त्यांना सगळंच ठाऊक असतं.म्हणुनच, 'व्यासोच्छिष्टं जगदसर्वम' असं म्हणतात ना.
"गणतंत्र म्हणजे सार्वभौम प्रजासत्ताक". इति केडी.
आता आली का पंचाईत! काही म्हणजे काही कळलं नाही. व्यासवाणी समजणं इतकं सोपं नाही म्हाराजा.

आमचा गोंधळ अधिकच वाढला. आता ब्रह्मादादालाच विचारावं. तर ब्रह्मादादा ब्रह्मानंदी टाळी लावुन बसलेले. थांबणे भाग होते. कोपरा धरून बसलो तर म्हणतात ना
 'संगति संङदोष:'. म्हणजे आमची देखील ब्रह्मानंदी टाळी लागली. अहाहा, अगदी हवेत विहरत होतो. पण हे काय? हा आवाज कसला. डोळे उघडले तेव्हा ब्रह्मादादा आमच्या गालावर थापट्या मारून आम्हाला जागे करत होता.

" किती घोरतोस तू श्रीखूळ? आमच्या साधनेत व्यत्यय आला. काय हवंय तुला?" अगदी मधाळ आवाजात
" अं, अम्, यम्, गणतंत्र, सार्वभौम प्रजासत्ताक". आम्ही
" अरे बरळतोस काय असा. नीट घडाघडा बोल". आता आवाज करडा.
" प्रणाम ब्रह्मादादा, गणतंत्र म्हणजे काय?" आमची नम्र पृच्छा.
" हं...............! श्रीखूळ, हा विषय तुला समजावणं माझ्या कुवतीबाहेर आहे. ज्या दिवशी तुला अक्कल येईल तो दिवस माझ्यासाठी मोक्षप्राप्तीचा असेल." ब्रह्मादादा हताश होऊन म्हणाले. कलियुगात आमच्या मातोश्री, तमाम शिक्षकवर्ग आणि आमच्या सुविद्य पत्नी या सर्वांचं या एका बाबतीत एकमत होतं.

"हे बघ, कलियुगात जंबुद्वीपात, भरतखंडात, महाराष्ट्रात भीमराव उर्फ बाबासाहेब नावाचा ज्ञानसूर्य जन्माला येईल. त्यांनी लिहिलेलं वाचशील तर तुझ्या रिकाम्या डोक्यात उजेड पडण्याची शक्यता आहे. जा आता तू. आमची साधनेची वेळ झाली."

ब्रह्मादादा उपाय सांगुन गेले. पण ज्ञानसुर्याचं लेखन न वाचता कपाटात ठेवून देऊन त्यावर निरर्थक वाद घालण्याऐवजी जर ते वाचून त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करणे असं जर केलं तर कलियुगातील जंबुद्विपातील भरतखंडातील लोक मला खेटरानं मारतील याची मला जाणीव असल्याने ते शक्य नव्हतं.

सरळ विष्णुभाऊंकडे गेलो. तर विष्णुभाऊ शेषनागाच्या शेपच्या सोफ्यावर आराम फर्मावुन राहिलेले. आम्हांला पाहुन लक्ष्मीवैनींच्या कपाळावर आठ्या.
" काय हवंय?" लक्ष्मीवैनी
आम्ही हात चोळत बोलायला सुरुवात करणार तोच लक्ष्मीवैनींनी आमच्या हातात मोहरांचा हंडा ओतायला सुरूवात केली. नेहमीसारखा कडकी लागली म्हणुन मागायला गेलो असा त्यांचा समज झाला. मिळालं ते घेतलं. पण प्रश्र्न तसाच. पाय घासत परत कैलासावर आलो तर पार्वतीवैनी दारातच उभ्या. अवतार मात्र दुर्गेचा.
" झालं का गांव कोळपुन? वैनीला काडीची मदत करता येत नाही तर गिळायला तरी वेळेवर हजर रहायचं."
" गणतंत्र म्हणजे काय हे शोधायला गेलो होतो."
" पाहिजेत कशाला नसत्या उचापती?.  चारीठांव गिळायला मिळतंय, तुमच्या डोक्यात कवडीइतकीही अक्कल नसतांना देखील तुमचे दादा, भाऊ आणि आण्णा प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारूनच करताहेत. आणि तुम्ही फिरतांय अक्कल शोधत." पार्वतीवैनी कडाडल्याच.

आईशप्पथ खरं सांगतो, गणतंत्र म्हणजे काय हे इतक्या सोप्या शब्दात कोणीच समजावलं नव्हतं.

मुकाट्याने आम्ही पार्वतीवैनींनी दिलेल्या प्रसादावर तुटून पडलो.

गणतंत्र चिरायू होवो.

श्रीखूळ
२६ जानेवारी २०१९.





No comments:

Post a Comment

कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...