Tuesday, 1 September 2020

एकादशं गणपतिं






 हे गणाधिपा, वत्सला तुझ्या चरणकमलांवर माझं मस्तक टेकवितांना

अपूर्व अनुभूती प्राप्त होते आहे रे!


दशदिसांच्या उत्सवात माझ्या अस्तित्वाच्या दशदिशा उजळुन निघाल्या आहेत. चोहिकडे मला 'गणेशप्रभा' फाकलेली दिसते आहे. मी अंतर्बाह्य मोहरुन गेलो आहे. हा माझ्या अंगणी फुललेला 'गणेशऋतु' अक्षय रहावा.
आज उत्सवमूर्तीचं विसर्जन.
आज असं का करेनास कि विसर्जन माझंच व्हावं. जाणीवांची जळकट कोळिष्टकं विरून जावीत आणि नेणीवतेचं निरभ्र आकाश व्हावं खुलं.
आपुल्याच मरणाचा अनुपम्य सोहळा बघुं देत मला. मी-तू पणाची बोळवण व्हावी.
अंतर्यामी उरावं केवळ लखलखतं 'गणेशतत्व'.

तुझ्या रुपवर्णनांत गुंग असणारा 'मी' हलकेच विरघळुन जावा तुझ्याच स्वरुपात.
असं दिव्य एकरुपत्व अनुभवावं या आत्म्यानं.

गं गणाधिपतये नमः
गं गणाधिपतये
गं
गं
गं

इतकीच 'श्रीशिल्लक' रहावी.


श्रीकुल
भाद्रपद शु. चतुर्दशी शके १९४२
1/9/2020

Monday, 31 August 2020

दशमं तु विनायकम







 हे शुभंकरा, शुभानना माझा अविनाशी आत्मा आणि विनाशी देह यांचं प्रतिनिधित्व करणारे माझे दोन्ही हात तुझ्यासमोर कायम जोडलेले असु देत.


विदेहातुन देहमार्गे पुनःश्च विदेह अवस्था हा जो माझा प्रवास आहे . त्यामध्ये स्वकर्मांचे अडथळेच फार.
हे सर्व पार करण्यासाठी नायकत्व असावं लागतं आणि ते निभवावं लागतं.
हेच मला तु कायम सांगतो आहेस.

माझ्यातल्या न-नायकाला नायकात परिवर्तित करणं तुलाच जमतं रे बाबा!

सिंदुरवदना, माझा हरेक विचार,हरेक शब्द, हरेक कृती माझ्यातील नायकाला या 'विनायका'ला शोभा देणारी असावी.

ईतकं तर तू देशीलच!

होय ना?

श्रीकुल
भाद्रपद शु. द्वादशी शके १९४२
30/8/2020

Sunday, 30 August 2020

नवमं भालचंद्रंच

 




हे कार्तिकेयानुजा, मूषकवाहना तुला नमन करतांना माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक कणांत जागृतीच्या लाटा उसळतात.


भाळी चंद्रकोर धारण केलेलं तुझं नयनमनोहारी रुप बघतांना जी शीतलता मनांतळी जाणवते तीच माझ्या अस्तित्वाचा गाभा व्हावी. हेच तुला सुचवायचं आहे ना?

विकारगणांवर अधिपत्य गाजविण्यासाठी ही चंद्रासम शीतळता बाणवावी लागते हे किती चतुराईनं सांगितलंस तू मला!

हे स्वसंवेद्या, माझ्या विचारांत, माझ्या शब्दांत, माझ्या प्रत्येक कृतीत, माझ्या दृष्टीच्या ठायी ही तुझा नित्य वास असेल तर ही परमसुखदायी शीतळता तेथे आपसूकच येईल.

खरंय ना?

श्रीकुल
भाद्रपद शु. द्वादशी शके १९४२
30/8/2020

Saturday, 29 August 2020

धूम्रवर्णं तथाष्टमम





 हे गौरीतनया, भालचंद्रा, तुला वंदन करणं, तुझ्यापुढे नतमस्तक होणं यापरतं सुख कशातच नाही हे मी जाणलं आहे.


तुझं आणि माझं अस्तित्व एकरुप व्हावं हीच तर ईच्छा मनीमानसी आहे. पण आपल्यामध्ये हा जो धूमासारखा पातळ पडदा आहे तो माझ्या बुध्दिभ्रमाचाच आहे.

केवळ तुझ्या कृपाशीर्वादानेच हे पटल विरुन जाईल. आणि याच तर क्षणाची मी युगानुयुगे वाट बघतो आहे.

हे अनंतनायका, मझी वाणी, माझे विचार, माझी कृती यापैकी कोणत्याही द्वारे
कुठल्याही विभ्रमाचं आभासी पटल तात्काळ नाहीसं होऊ देत.

या वरदानाच्या प्रतीक्षेत आहे रे मी.

श्रीकुल
भाद्रपद शु. एकादशी शके १९४२
29/8/2020

Friday, 28 August 2020

सप्तमं विघ्नराजेंद्रं





 हे गोसावीनंदना, मुनीजनसुखकारका तुला वंदन करतांना माझं ह्रदय उचंबळुन येतं आहे.


तू असुरांसाठी विघ्नकर्ता आहेस तर भक्तजनांकरिता विघ्नहर्ता आहेस. तू आणि मी खरेतर एकमेकांचीच रुपे आहोत असं असतांना हा द्वैतासुर माजला आहे.

मला माझ्यामध्ये तुझा अनुभव घेण्यांआड या द्वैताचंच मोठं विघ्न आहे. तू तुझ्या नांवाला जाग आणि समूळ नाश कर या भिन्नभावनासुराचा.

मी अधीर आहे तुझं सर्वमंगलकारी स्वरुप माझ्याआंत अनुभवायला.

हे पाशांकुशधारा, माझी वाणी, माझी कृती, माझे विचार, माझी दृष्टी यासर्वांमध्ये
तुझा अंगीभूत गोडवा वसुं देत.

'तथास्तु' म्हणतो आहेस ना?

श्रीकुल
भाद्रपद शु. दशमी शके १९४२
28/10/2020

Thursday, 27 August 2020

षष्ठं विकटमेवच

 



हे ओंकारस्वरुपा, अनाथनाथा, तूला वंदन आणि तुला नित्यवंदना देण्याचं भाग्य तू मला दिलंस याबद्दल मी कृतज्ञ आहे.


तुझा विचार करावा तितका तू अनाकलनीय वाटतोस रे! जरी तू विश्वातील प्रत्येक गोष्टीचा 'मूळारंभ आरंभ' असलास तरीदेखील तुला समजुन घेण्यासाठी कोठुन सुरुवात करावी हेच उमगत नाही.

माझ्या मनोलहरी अशा अस्ताव्यस्त झाल्यावर तूच त्यांना आवरुन घेतोस.

हे गौरीसुता,तुझ्या नित्यस्मरणाने माझा प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती अशी
'गणेशसुत्रा'मध्ये बांधली जावो.

श्रीकुल
भाद्रपद शु. नवमी शके १९४२
27/8/2020

Wednesday, 26 August 2020

लंबोदरं पंचमंच

 


हे दयानिधे, भक्तवत्सला, तुझा कृपाहस्त सदैव माझ्या मस्तकी असावा अशी मी प्रार्थना करतो.


तुझी परिमाणंच आगळी आहेत. खरंतर आम्हांला ज्ञात असलेल्या परिमाणांच्याही अनेक अंगुळे तू वर आहेस. हि विशालता माझ्याही ह्रदयांत असावी हेच तू कल्पिलं असशील ना?

सर्व ब्रह्मांड सामावुन घेता यावं ईतकी मनाची विशालता असावी हेच तू तुझ्या आकाराद्वारे मला सुचवतोस ना!



हे मंगलमुर्ती, माझ्या शब्दांतुन, विचारांतुन, कृतीतुन तुझ्यासम ह्रदयाची विशालता कायम व्यक्त व्हावी येवढंच ईवलुसं मागणं आहे रे माझं.

श्रीकुल
भाद्रपद शुं अष्टमी शके १९४२
26/8/2020

कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...