तीन आठवडे उलटुन गेले तरी 'मी वसंतराव'चं गारुड उतरत नाहीये. काय असावं कारण? वसंतराव आणि त्यांची गायकी आवडतेच, त्यामुळे असेल का? राहुलचा सहजसुंदर वावर कि निपुणचं दिग्दर्शन? कि तीन तास दर्जेदार गाणी ऐकायला मिळाली म्हणुन? होय, ही सर्व कारणे आहेतच. पण अजुनही एक खास कारण आहे. ते म्हणजे या चित्रपटातली बोलणारी शांतता.
होय, या चित्रपटाचा गाभाच मुळी बोलणारी शांतता आहे. अनेक प्रसंग असे आहेत या चित्रपटात जेंव्हा ही शांतता स्वच्छ ऐकु येते आहे. ती आपण नीटपणे ऐकावी यांसाठी थोडी आधीपासुन आपली तयारी करुन घेतली जाते आणि अस्सल गवई ज्याप्रमाणे हळुवारपणे समेवर येतो तशी शांतता येते. ती त्या आधीच्या प्रसंगापेक्षा अधिक बोलते, अधिकचं सांगते.
वसंतरावांची आई लहानग्या वसंतरावांना घेऊन घर सोडते. वडिल बिचारे घराच्या पाशात अडकलेले. सुरुवातीला ते बायकोबरोबर निघतात पण वडिल बंधुंच्या दटावणीपुढं नमतात. निरुत्तर होतात. काहीच बोलत नाहीत. नुसतेच बघत राहतात. त्यांच्या मनांतली घालमेल ती शांतता सांगत रहाते आपल्याला.
मास्टर दिनानाथ गायकीचं वर्म समजावताहेत वसंताला. "असं गावं ना वसंता कि ऐकणार्याला दाद देण्याचंदेखील भान उरु नये." गुरु असंच काही मर्मग्राही सांगतात. त्यामागे त्यांची तपश्र्चर्या असते, अनुभवांच्या भांडारातुन असे बोल येतात. एखादाच शिष्य नेमकं समजतो आणि वाटचाल सुरु करतो. वसंतराव असेच. असं गायचं कि श्रोत्यांना भानच उरलं नाही पाहिजे. याच ध्यासानं नटलेलं गाणं आयुष्यभर सादर करतात. शेवटच्या मैफलित सुरांची अशी अशी पेशकश करतात जणु चमचमणार्या शलाकांसह, गडगडाटी धारांचा वर्षाव. श्रोते चिंब झाले आहेत आणि मग येते ती शांतता. जिचा त्यांनी आयुष्यभर ध्यास घेतला आहे. टाळी वाजवायला हात उचलले तरी समाधी भंग पावेल कि काय या भ्रांत अवस्थेत श्रोते आहेत. आता शांतता बोलते आहे. काय म्हणते आहे ती? हे मात्र ज्यानं-त्यानं समजावुन घ्यायचंय. असा भान हरपायला लावणारा अविष्कार आपल्याला आपल्याच मनाच्या खोल गाभार्यात घेऊन जातो. तिथला कुठला कोपरा त्यानंतर उजळेल हे सांगता येत नाही. पण कुठल्यातरी हळव्या संधीकालात आपण जातो हे निश्चित.
एका सवाई गंधर्व महोत्सवात दुसर्या दिवशी शेवटी म्हणजे शनिवारी पहाटे रशीदखान गायला बसले. साधारणतः प्रत्यक सत्राचा शेवट नामवंत गायक करीत असत त्या तुलनेने त्यावेळी रशीदजी नवखे होते. मंडपात हलकीशी नाराजी होती. पण रशीदजींनी अप्रतिम ख्याल गायकी पेश केली. मैफीलीचा शेवट करतांना त्यांनी बडे गुलाम अलींची प्रसिद्ध ठुमरी 'याद पियाकी आये' सुरु केली. आख्खा मंडप स्तब्ध झाला. आपल्याच श्वासाचा आवाज येऊ नये म्हणुन दक्षता घेऊ लागला. सफाईदारपणे समेवर येऊन ते थांबले पण मंडपातुन जराही आवाज आला नाही. काही क्षण असच शांततेत गेले, सोन्याहुनही मौल्यवान शांतता. अचानक वळिवाच्या तडतडीप्रमाणे टाळ्यांचा अखंड नाद घुमायला लागला. वन्स मोअरचा गजर झाला. ऐंव्हाना रमणबाग शाळेची मुलं सकाळची शाळा असल्याने यायला लागली होती. आता वन्स मोअर घ्यावा की अनुभवलेली शांतता कवटाळुन थांबावं या संभ्रमांत रशीदजी होते. इतक्यात साक्षात पं भीमसेनजी उठले आणि त्यांनी पुन्हा गाण्याचा जणु आदेशच दिला. पुन्हा अप्रतिम अदाकारी, तीच सुरांची लयलुट, यावेळी अंदाज असुनही ठुमरी संपल्यावर मंडपात नीरव शांतता.
तुम्हीच कल्पना करा, काय बोलली असेल ती शांतता? काय सांगितलं असेल तीनं रशीदजींना? काय तरंग निर्माण झाले असती श्रोत्यांच्या मनांत? आठवत असेल त्यांना तो क्षण आजही?
बेगम अख्तर यांना आपण का गायचं हे नेमकं उमगलेलं होतं. " मैं सुकुन के लिए गाती हूॅं". तो सुकुन, ती शांतता जिच्यासाठी कलाकार अतोनात कष्ट करतात, प्रत्येक श्रोता प्रत्येक मैफिलीला जातांना आजतरी ही शांतता अनुभवायला मिळेल या आशेवर जातो. ती शांतता मुकी असते असं कसं बरं म्हणता येईल? अशी शब्देविण संवादु साधायला लावणारी शांतता मी वसंतरावमध्ये अचानक भेटते ना, तेंव्हा काय होतं?
काहीच नाही. फक्त शांतता. निखळ, नितळ शांतता.
श्रीकुल
23/4/2022

No comments:
Post a Comment