Saturday, 22 August 2020

प्रथमं वक्रतुंडंच

 


हे गणराया, सुदिन सुवेळ तुझं आख्यान मांडलंय. ते तू ऐकायला ये. रिद्धि-सिद्धिंसह ये, जगज्जननी माता पार्वतीसह ये. सेनापती कार्तिकेयासह ये. मोहलोभरुपी मदनाचा नाश करणार्‍या भगवान शंकरासह ये.

अरे, पण तुला बोलाऊ धाडतोय म्हणुन आश्चर्य वाटुन घेऊ नकोस. तू माझ्याच ठायी आहेस याची मला जाणीव व्हावी येवढंच मागतोय. तूच माझी बुद्धी आहेस ना ! याची जाणीव मला सदोदित असु देत.

सूर्यकोटि समप्रभ म्हणजे कोट्यवधी सूर्यांच्या प्रकाशाइतकी प्रभा असलेला तू माझ्याठायी नित्य निवास करुन आहेस याचा मला विसर न पडू दे.

तीनशे साठ अंशात वळण्याची क्षमता असलेल्या तुझ्या सोंडेसम असलेली माझी बुद्धि अशीच साकल्याने सर्व प्रसंगात वापरण्याची चिरंतन प्रेरणा मला मिळू देत. मग माझं प्रत्येक कार्य निर्विघ्न पार पडेलच असा विश्वास मला राहु देत.

तुझ्या आकाराइतकाच माझ्या बुध्दिचा आवाकादेखील
महाकाय असु देत.

माझ्या प्रत्येक विचारांत, प्रत्येक कृतीमध्ये तुझं अधिष्ठान असावं इतकंच.

श्रीकुल
भाद्रपद शु. चतुर्थी शके १९४२
22/8/2020

Sunday, 12 January 2020

शाळाःएक चिंतन

सरत्या वर्षाच्या शेवटीशेवटी मला सातारा येथील डॉ. जे. डब्ल्यु. आयरन प्रशालेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमास हजर राहण्याची संधी मिळाली. यांत माझं कर्तुत्व इतकंच कि या शाळेचे संस्थापक डॉ. आयरन हे माझे आजेसासरे. माझी पत्नी स्मिता हिचे आजोबा. अतिशय ह्रुद्य असा कार्यक्रम होता. गेल्या पन्नास वर्षांत येथुन शिकुन गेलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविते झाले. आपापल्या आवडीच्या क्षेत्रांत नामांकित असलेले, आयुष्यांतील गोडतिखट अनुभवांनी शहाणपण आलेले सर्वजण अक्षरशः मूल होऊन बागडत होते. आपल्या आवडत्या आणि नावडत्या देखिल शिक्षकांच्या पाया पडत होते. त्या वयोव्रुद्ध शिक्षकांच्या थकलेल्या डोळ्यांत आपलं हरवलेलं बालपण शोधीत होते. आपल्या पदव्यांच्या, मानमरातबांच्या झुली उतरवुन ,काही तासांपुरते का होईना पुन्हां शाळकरी झाले होते. अक्षरशः बागडत होते. जणुकाही मधली काही वर्षे कालपटलावरुन पुसली गेली होती. स्मरणरंजनाच्या डोहांत आकंठ बुडालेल्या त्या जाणत्यांच्या अजाण गर्दीला पाहुन माझ्याही डोळ्यांच्या कडा पाणवत होत्या. नकळत माझी शाळा, शाळूसोबती यांच्या आठवणींचे कढ मनांत दाटुन येत होते.

खरंच, शाळा ही किती अविस्मरणीय असते नाही? आठवणी अशा म्हातारीच्या पिसासारख्या उडायला लागल्या कि 'माझा न मी राहिलो' अशी अवस्था होते.
हि कालवाकालव मनांत चालु असतांना एक अनादि प्रश्न मनांत उफाळुन येत होता. तो म्हणजे, आपण शाळेत जातोच कशाला? मला माझ्या बालपणी जेंव्हा शिशुवर्गात पाठविण्याचे अनेक केविलवाणे प्रयत्न माझ्या पालकांनी केले. तेंव्हापासुन हा प्रश्न माझ्या मनांत रुंजी घालतो आहे. अर्थात, वयाच्या प्रत्येक टप्प्यांवर या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरं मिळत गेली.

"शिकला नाहिस तर आयुष्यभर दुसर्‍याच्या घरची भांडी घासावी लागतील" हे आद्य उत्तर जरा भितीदायकच होते. एखाद्या दिवशी चुकुन जरी शाळा बुडाली तरी डोळ्यांसमोर भांड्यांचा ढीग येई. गोवर, कांजिण्या, फ्लू,टायफॉईड असल्या रोगांनी हा प्रसंग सुरुवातीच्या काळांत तसा वारंवार यायचा. अर्थात भांडी घासण्याचा आणि शिक्षणाचा काहीएक संबंध नसतो हे लग्न झाल्यावर चांगलेच उमगले म्हणा.

"खुपखुप नवीन शिकायला मिळतं शाळेत". हि निव्वळ अफवाच असते हे कळेस्तोवर कॉलेजमध्ये पोहोचलो होतो.

"अरे, नवीन छानछान मित्र मिळतात शाळेत". मित्र मिळाले पण ते सगळेच छानछान होते हे कबूल करण्यांऐवजी मी "आमच्या हिच्या हातची कारल्याची भाजी अगदी साखरेईतकी गोड लागते" या वाक्यावर विश्वास ठेवीन.

"नुसता उच्छाद मांडलाय या कार्ट्यानं. शाळा असली कि बरं असतंय. तेवढीच चार घटका विश्रांती तरी तरी मिळते याच्यापासुन" हे उत्तर आहे कि पालकांची प्रांजळ कबुली?

"शाळेत गेलं ना कि नवनवीन खेळ शिकता येतात". क्रिकेटशिवाय दुसरा खेळ असु शकतो यांवर जरासुद्धा विश्वास नसलेल्या मला तो शिकण्यांसाठी शाळेत जायची गरजच नव्हती. शाळेचा आणि खेळाचा अर्थाअर्थी संबंध नसतो हे तर अनेक जान्यामान्या आजीमाजी खेळाडूंनी सिद्ध करुन दाखवलंयच की.

'नवीन ज्ञानाची कवाडं उघडण्यासाठी शाळेत जायचं असतं" हे वाक्य तर केवळ सुविचार म्हणुन ठिक आहे हे ठामपणाने सांगितल्यावर पित्रुदेवांनी त्याहुन अधिक ठामपणे माझ्या पार्श्वभागावर प्रहार केल्याचं आजही आठवतंय. शिक्षेची ही पद्धत ते त्यांच्या शाळेत शिकल्याचे त्यांनी मागाहुन सांगितल्यावर तर माझा शालेय शिक्षण या विषयावरचा विश्वास कायमचा उडाला.

विशेषतः, आजच्या युगांत घरबसल्या ज्ञान मिळविण्याची सोय सर्वसाक्षी ' भगवान वेबदेव' यांच्या कृपेने उपलब्ध असतांना तर शाळेत जाणं हा वेळेचा निव्वळ अपव्यय आहे. हे माझं मत बनत चाललंय. त्यामुळे शाळा तरी कशाला हव्यात?

समोरची ती वय हरवलेली गर्दी, माझ्या मनातला हा कोलाहल. कशाचाच मेळ बसत नव्हता. तेवढ्यांत माझ्या मुलाला डॉ. जे. डब्ल्यु. आयरन म्हणजे त्याच्या पणजोबांचा फोटो दिसला. अनेक विद्यार्थी त्यापुढे नतमस्तक होत होते. अनेकजण त्यांच्या आठवणी सांगत होते. ते पाहुन मुलगा म्हणाला,
" वॉव, बाबा यासाठी जगायचं असतं. आपण गेल्यानंतरही आपली आठवण अशी चिरंतन राहिली पाहिजे." मी चकित झालो.
"तुम्हांला एक गोष्ट सांगतो". असं म्हणुन त्यानं मला एक गोष्ट सांगितली. त्या कथेचा नायक म्रुत्युशय्येवर असतांना त्याच्या मुलाला सांगतो कि,
"तुला ठाऊक आहे का आपण नेमके कधी मरतो?
"जेंव्हा एखादी गोळी सणसणत येऊन आपल्या ह्रदयात घुसते तेंव्हा? नाही."
"जेंव्हा एखादा असाध्य रोग आपल्याला संपवतो तेंव्हा? नाही"
"जेंव्हा प्यालाभर विष आपला कंठ चिरत जळजळत आत उतरतं तेंव्हा? नाही"
"आपण मरतो, जेंव्हा आपण आपल्याच आप्तांच्या विस्मृतीत जातो तेंव्हा"

"हो पण ही गोष्ट आणि हा समारंभ, काय संबंध? मी गोंधळुनच मुलाला विचारलं
"जोवर या विद्यार्थ्यांच्या मनांत आठवणी आहेत तोवर ही शाळा, ती सुरु करणारे 'दादा सर' म्हणजे डॉ. आयरन हे अजरामर नव्हेत काय?" मुलगा उत्तरला.

लख्खकन प्रकाश पडला आणि दुसरा प्रश्न म्हणजे शाळा हव्यातच कशाला याच उत्तर मिळालं. "अशा अनंत आठवणकुप्या तयार करण्यासाठी शाळा हव्यात. 'भगवान वेबदेव' देतात ती माहिती असते निव्वळ, पण शाळा त्या माहितीचं ज्ञानांत रुपांतर कसं करायचं हे सांगतात.

त्या प्रांगणांत जमलेले शेकडो विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे चरणस्पर्श करायला उतावीळ असलेले पाहुन उमगलं कि ज्या चरणांवर माथा टेकवावासा वाटतो ते वंदनीय चरण शोधण्यासाठी शाळेत जायचं असतं.

मला उत्तरं मिळाली. कार्यक्रमाचा आनंद घेता आला.
असं 'बेगाने शादीमे दिवाना' होण्याचं भाग्य मिळालं.
इतका सुरेख, नेटका कार्यक्रम केल्याबद्दल आणि त्यांत आम्हांला सहभागी होण्याचं सौख्य दिल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार.

श्रीकुल
११/१/२०२०




Sunday, 20 October 2019

पाऊस


 आठवांना फुटती डोळे अन मन हे मंतरलेले
 हा पाऊस येतो तेंव्हा हे असे कायसे होते

 अवखळपण हे माझे सुखेच उसळी घेते
भिजल्या भाळावरचे कुंकुम मग विस्कटते
 लपविण्यास श्र्रंगाराचा अवघडसा हा बोभाटा
 कुठुनशी मग नाजुक सर ही धाऊन येते

 तू नाही म्हटले होते ते ऐकु आले नाही
घनघोर बटांचे वेढे अधिक बोलके होते
त्या विस्कटल्या केसांचे कारण होण्यासाठी
अधीर तडतड त्याची छान बहाणा होते

 स्पर्शास शाप शिर्शिरीचा वस्त्रांहुन ओले गात्र
 मौनास नवे धुमारे येती सांगती कहाणी नेत्र
 शेवट त्या कहाणीचा व्हावा गोड म्हणुनी
रतीच्या वेगासम ही मुसळधार मग येते

 श्रीकुल
आईतवार, २०/१०/२०१९

Saturday, 19 October 2019

जटायू

याद है वह दिन
जब घने जंगल में
वो अकेली थी

भिक्षा के बहाने
वो सामने आया
किंतु हेतू उसका
छिप नहीं पाया
देखकर उसका
सुंदर रुप
मन ही मन
वो ललचाया,
बुलाके उसको
रेखा के पार
हरण उसने
सहज कर लिया
सोच रहा था
पाना था वह
पा ही‌ लिया,
आकाश मार्ग से
उड़ जाऊंगा
अब क्या कोई
रोक सकेगा?
अहंकार उसका
चूर हुआ जब
पंछी उसपर
झपटा था
इतनी-सी ताकत
थी उसकी
पर अंत तक
वह लढा था

आज भी रावण
रोज आता है
दुष्टसी बातें
करता है
भाषण उसका
सुनके पूरा
आज भी मस्तक
झुकता है

कोने में बैठी
उदास सीता
भयभीत हो
जाती है
डर न उसे रावणका
किंतु खेद है उस बात का
सुननेवालों में एक भी
जटायू ना होने का

श्रीकुल
५ /९/२०१८

द्वारका

नसोत अंधाराचे मिणमिणते सांजदिवे हे
नकोत करपवणारी आठवांची संध्याछाया
घनगर्द क्रुष्णमेघांची नकोच दाट ही वस्ती
अशी द्वारका माझी स्वप्नांची कोवळी नाती

नात्यांना अर्थ देणारी ही गूढरम्य स्तोत्रे
गुणगुणता काहि ओळी थरथरती ओली गात्रे
नवलाख दिव्यांनी होई नित्य जिथे आरती
अशी द्वारका माझी स्वप्नांची कोवळी नाती

नवा व्यासहि स्तब्ध ,असे काव्य जेथे
बालांच्या ओठि गीता क्रुष्णास पडे साकडे
कर्त्याच्या मोक्षासाठी कर्माची नच आहुती
अशी द्वारका माझी स्वप्नांची कोवळी नाती

राणा मी या नगरीचा मी काळ कालयवनाचा
जरा न बाधे मजला , आनंदाचे भवती वेढे
राधेस शोधता न आली रुक्मिणीस नच माहिती
अशी द्वारका माझी स्वप्नांची कोवळी नाती


श्रीकुल
श्रीक्रुष्ण जयंती
23/8/2019




राम

त्यांनी दरडावुन विचारलं
इतकं बावनकशी निखळ सोनं
मिळवलंस तरी कुठुन

मी इतकंच म्हणालो कि,
ते शुभेच्छा देत गेले अन्
मी फक्त साठवत गेलो

तंत्र नाही मंत्र नाही
शस्त्र नाही वस्त्र नाही
लढाई जिंकलीस तरी कशी

मी इतकंच म्हणालो कि,
त्यांनी हे युद्ध आपलंच मानलं
अन शत्रु निमूट माघारी गेला

कद नाही कि पद नाही
डोईवर कुठली टोपी नाही
हा जयकार कसा काय

मी इतकंच म्हणालो कि
त्यांनीच दगडात फुंकला प्राण
अन अंतरी जागला राम

श्रीकुल
विजयादशमी
८/१०/२०१९














विराणी

या उदास संध्येवरती तुझी निशाणी होती
रसभरल्या ओठांवरती नवी विराणी होती

सोडुनी बोट मायेचे तू नवी वाट ही घेता
रेंगाळत उंबर्‍यापाशी कानोसा घेउन येशी
क्षितिजावर गात्रांच्याही नवी कहाणी होती

अंधारमध्य साधावा बाहुंच्या विळख्याआत
मग भान उरावे कसले अशी रम्य रात
एकांत विरावा ईतकी रात्र शहाणी होती

कालचाच चंद्र कसा हवाहवासा होता
भरुन मन वाहिले तरीहि प्रश्र्न एक होता
चंद्रकोर भाळीची का अधिक देखणी होती

या उदास संध्येवरती तुझी निशाणी होती
रसभरल्या ओठांवरती नवी विराणी होती

श्रीकुल
1३/10/2019















Sunday, 8 September 2019

चिडलोय


मी चिडलो आहे हि बातमी वार्‍याच्या वेगाने पसरली.

कारण मी कधीच चिडत नाही. हसनेसे सबकुछ हो जाता है तो चिडनेका कायकू? असा आपला शिंपल फंडा. नॅन्सीनं हि बातमी शलाका म्हणजे माझ्या बायकोला सांगितली. नंतर नोटिस बोर्डवर लावल्यासारखी अॉफिसमध्ये पसरली. P-Soft Technologies हे आमचं अॉफिस. परांजपे नावाच्या एका चतुर माणसानं काळाची पावलं ओळखुन नव्वदच्या दशकात हि सॉफ्टवेअर कंपनी चालू केली. मी इंजिनिअर झालो आणि पहिलाच जॉब इथं मिळाला. माझं काम आणि हसणं परांजप्यांना फार आवडायचं. " जग जिंकशील लेका या जोरावर" असं म्हणायचे मला. नव्व्याण्णव साली माझ्या नावावर चाळिस टक्के शेअर्स करुन दिले आणि स्वतः अमेरिकेला स्थायिक झाले. तेंव्हापासुन मीच सगळं बघतोय. पण हे माझ्या चिडण्याचं कारण नाही.

आमचा पसारा तसा बराच मोठा आहे. पण नॅन्सी उर्फ EP- Everthing Possible आणि जगन —ADM म्हणजे Any Duty Manager हे दोघे हा पसारा लिलया सांभाळतात. नॅन्सी रोज सकाळी तिची नॅनो, तिला ती नॅनुटली म्हणते घेऊन मला घ्यायला येते. घरात येते, आधी आईचा हात हातात घेऊन किस करते, नंतर शलाकाला दोन रोझेस देते. मग आम्ही दोघे अॉफिसला येतो. माझ्याकडे दोन मोठ्या गाड्या आहेत पण EPचा आग्रह मोडवत नाही. त्यातुन नॅन्सी म्हणजे आईची भलतीच लाडकी. तिच्या नवर्‍याला दर अधिक महिन्यांत घरी बोलावुन 'अधिकाचं वाण' द्यायच्या आमच्या आउसाहेब. माऊली एकुणच प्रेमळ. प्रत्येक वार एकेका देवाला वाटुन दिलेला. शनिवार शनीमहाराजांना देऊन बुधवार मारुतीला. अशीहि अॅडजेस्टमेंट आहे. दर शनिवारी नॅनुटली मधुन शनीमहाराजांच्या डोक्यावर तेल ओतायला जातात मातुश्री. हे चिडण्याचं कारण नव्हे.

P-Softचे दुसरा आधारस्तंभ म्हणजे 'जगन्या' हा मी हायर केलेला पहिला माणूस. तुला काय येत? या प्रश्नावर "थोडंसं COBOL आणि तुम्ही सांगाल ते" हे उत्तर मला जाम आवडलं. हा थोडासा नेपोलिअन टाईप ईसम आहे म्हणजे याच्या डिक्शनरीत 'अशक्य' हा शब्द नाहीये.
"सर, तुम्ही सांगताय ना मग हे काम होणारच". असला खाक्या.
हा दिवसभर बोलतो. अगदी त्याच्या लॅपटॉपशीही
." आता जरा MS Word ऊघड बघु, चला आता दोन ईमेल पाठवुन टाकू. जमेल ना?" असलं खुळंय. पण गंमत म्हणजे गेल्या महिन्यांत आमच्या कंपनी नेटवर्कवर व्हायरस अॅटॅक झाला तेंव्हा आमचे सगळ्यांचे मशीन्स झोपले फक्त जगन्याचा लॅपटॉप मात्र ठणठणीत.
"अरे त्याला वॉर्न केलं होतं. सगळे लुडकलेत' तूपण आडवा झालास तर वांदे होतील. तस्मात, जागा रहा. दिवस वैर्‍याचा आहे. ऐकलंन त्यानं" आहे काही उत्तर?
याला प्रॉब्लेम सांगा आणि वेळ द्या. हा सोल्यूशन देणारच. आई त्याला 'संकटमोचक हनुमान' म्हणते. एकदा इन्कमटॅकसची नोटिस आली. अकाउंटंट आणि फायनान्स हेड दोघांनाही प्रकरण आटपेना. मग 'संकटमोचक' गेले धावुन. दोन दिवस इन्कमटॅक्स अॉफिसमध्ये घालवुन प्रॉब्लेम सोडवुनच माघारी. यात नवल नाही. नवल तिसर्‍यादिवशी घडलं. तिसर्‍या दिवशी तो इन्कमटॅक्स कमिश्नर जगन्याला शोधत अॉफिसमध्ये.
 " काय रे? काय झालं आता?"
"काहि विशेष नाही. त्यालाच मदत पाहिजे. अँटीकरप्शनवाल्यांनी हेरलाय म्हणे त्याला. सोडव म्हणतोय." जगन्यादेखील चिडत नाही. राग आला कि मोठ्याने, हॉहॉ करुन हासतो तेवढा.
हेदेखील माझ्या चिडचिडीचं कारण नाहिये.

मी म्हणजे बन्या उर्फ गजानन कुलकर्णी. मी स्वतःला फास्टर फेणे उर्फ बन्या याचा प्रथमावतार समजतो. फाफे वाचल्यापासुन मी सर्वांना माझं नांव बन्या उर्फ गजानन असंच सांगत असे. आता ओरिजिनल बन्या करतो तसं म्हणजे मी चोरांना, स्मगलरांना पकडत नाही तर क्लाएंटना पकडतो. आमच्या अॉफिसात बन्या आणि जगन्याची जोडी फेमस आहे. जगन्या जॉईन झाल्यानंतरच्याच वर्षातली गोष्ट. रिलायन्सला आम्ही काही प्रोग्राम्स बनवुन दिले होते. त्याचं पेमेंट यायचं होतं. परांजप्यांनी कामगिरी माझ्यावर सोपवली. मी म्हटलं
" जगनला घेऊन जातो. त्यालाही शिकता येईल."
मी आणि जगन्या पोहोचलो. जगन्याला म्हटल
."मी यांचा VP भोजवानीला भिडतो. तु जरा आजुबाजुचं बघ." तो समजला.
सुमारे साडेतीन दिवस मी भोजवानींबरोबर होतो. या दरम्यान आम्हांला एकदोनदा 'The Great धीरुभाई' दिसले. भेटलो नाही पण मनोमन आदराने नमस्कार मात्र केला. साडेतीन दिवसांच्या तपश्चर्येनंतर भोजवानी प्रसन्न. फळ काय तर, मागच्या पेमेंटचा चेक, दिडकोटींची नवी अॉर्डर विथ अॅडव्हान्स पेमेंट. मी केबिनबाहेर आलो तर जगनमहाराज गायब. मी शोधत शोधत 'The Great धीरुभाईंच्या' केबिनपाशी आलो तर आतुन 'हॉहॉ' असा हसण्याचा आवाज. मी हे हसणं ओळखलं. मी घाबरलो. कारण हा चिडल्यावरच असा हसतो हे मला माहित होतं. क्षणाचाही विचार न करता मी दार ढकलुन आत घुसलो. तर समोर साक्षात 'The Great धीरुभाई' बसलेले आणि त्यांच्यासमोर आमचे ADM उर्फ जगनराव.
"बोलिये" 'The Great धीरुभाई'
" मेरे बॉस है। गजानन सर।" इति जगनराव
"अरे वा! आईये, बैठिये । आपकी तारीफ सुनी और आपको मिलने का सौभाग्य भी मिला । क्या बात है। 'The Great धीरुभाई'
" थँक्यु सर। मी
फार काहि बोललोच नाही. जगन्याला तिथुन बाहेर काढणं महत्वाचं होतं. आम्ही त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.
"काय दिवे लावलेत म्हाराज?"
"आज्ञापालन. तुम्हीच सांगितलं होतं ना 'आजूबाजूला बघ'. बघितलं".
"थेट 'The Great धीरुभाई' यांच्यापर्यंत?"
"सर, तुमच्याबरोबर राहिलो तर PM अॉफिसपर्यंत पण जाईन. शिकलोय तुमच्याकडुनच."
"हसत का होतास?"
जगन्याने उत्तर नाही दिलं.
 पण हे काय माझ्या चिडण्याचं कारण नाही.

आज सकाळची वेळ. मला स्टेपलर हवा होता. नेमकं गरजेच्या वेळेला गायब होण्याचा गुणधर्म असलेली ही एक वस्तु. केबिनबाहेर आलो तर सगळा स्टाफ सकाळच्या चहासाठी पँट्रीमध्ये गेलेला. आता कोणाचा तरी ड्राॅवर उचकला पाहिजे. आमच्या प्रथेनुसार कोणाच्याच ड्राॅवरला कुलुप नसतं. जगन्याच्या केबिनमध्ये घुसलो. पहिला ड्राॅवर उघडला. त्यात 'The Great धीरुभाई' यांचा फोटो फक्त. उजवीकडचा पहिला ड्रॉवर कुलुपबंद. दुर्‍यामध्ये स्टेपलर. काम झाल. पण तो ड्राॅवर बंद का? ध्यानात घ्या हे माझ्या चिडण्याचं कारण नाहिये.

थोड्या वेळानं जगन्या काही कामानिमित्त माझ्या केबिनमध्ये आला. ती चर्चा दोन तास चालली. मग आम्ही जेवणासाठी डबे उघडले. मी जेवतांना स्टेपलर शोधमोहिम सांगितली. जगन्याला विचारल कि
 "दोन गोष्टी सांग"
"'The Great धीरुभाई' यांचा फोटो का ठेवतोस आणि दुसरा ड्राॅवर बंद का?"
"हे ऐकायला आणि समजुन घ्यायला माझ्या केबिनमध्ये यावं लागेल."
आम्ही आता जगन्याच्या केबिनमध्ये.
"सर 'The Great धीरुभाई' म्हणजे माझ्यासाठी आदर्श. माणसं जोडायची कशी या कलेतले महागुरु. मी रोज त्यांचा फोटो पाहुनच दिवसाची सुरुवात करतो."
"What about the Locked one?"
" या सर. ईथं तुमचा फोटो आहे. बघा. मी माझ्या आईवडिलांकडुन, शिक्षकाकडुन जेवढं शिकलो त्यापेक्षा जास्त तुमच्याकडुन शिकलोय. म्हणुन ठेवलाय सर."
"This is crazy".
"क्रेझी नाही. I mean it Sir. तुम्हांला आठवतं आपण रिलायन्समध्ये गेलो होतो आणि 'The Great धीरुभाई' यांना भेटलो ते".
"हो चांगलंच आठवतंय"
"सर, तुम्हांला मी 'The Great धीरुभाई' यांच्यापर्यंत कसा पोहोचलो आणि आमचं काय बोलणं झालं हे सांगितलंच नाही."
" अरे हो रे. दिड कोटींच्या अॉर्डरच्या धुंदित मी पण विचारलंच नाहि. आणि विसरुन गेलो."
"सर, आपण तीन दिवस तिथं होतो. तुमच्या आदेशाप्रमाणे मी आजुबाजुचं बघत होतो, ओळखी करुन घेत होतो. चाणाक्ष आणि चौफेर नजर असलेल्या 'The Great धीरुभाई' यांच्या नजरेतुन आपला वावर सुटणं शक्यच नव्हतं. चौथ्या दिवशी दुपारी त्यांचा PA जो तोपर्यंत माझ्या चांगल्याच ओळखीचा झाला होता माझ्याकडे आला. तुला आंत बोलावलंय. मी याच संधीची वाट बघत होतो. मी आत गेलो. माझं दैवत मला दिसलं. मी हात जोडले. त्यांनी मला बसायला सांगितलं. चहा पाजला. काय कामासाठी आलोय हे विचारलं. मी सगळं खरंखरं सांगितलं. अगदी 'आजुबाजुला बघ' इथपर्यंत. तुमचीच शिकवण बिझनेसमध्ये Honesty pays you more than your expectations. फार खुष झाले. मला म्हणाले,
" तुम दोनोंकि जोडी कमाल की है। बहोत उँचाई छू लोगे तुम। अगर चाहते हो तो हमें जॉईन कर सकते हो। आजसे, अभी।"
यांवर मी हसलो आणि तुम्ही आंत आलात."

यांवर चिडायचं नाही तर काय?



श्रीकुल
5/9/2019

Disclaimer: या कथेमध्ये रिलायन्स आणि The Great धीरूभाई यांचे उल्लेख केवळ आदरापोटी आलेले आहेत. P-Soft technologies या नावाची कंपनी आढळल्यास केवळ योगायोग समजावा.



Friday, 23 August 2019

ब्रिगेडिअर बाबा जाधव

"मी ब्रिगेडिअर बाबा जाधव बोलतोय."

"या रविवारी आपण सकाळी दहा वाजता नांदुर्णीला आमच्या घरी या. महत्वाचे काम हातावेगळे करणे आहे. हे काम सोमवारपर्यंत लांबण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण आपल्या कामाची पर्यायी व्यवस्था करुन यावे. मुक्कामाची सोय आमच्याच घरी केली आहे."

सुस्पष्ट आवाज, तपशीलवार आणि काटेकोर सूचना, आवाजात कमालीची जरब. माझ्या नजरेसमेर एका करड्या शिस्तीच्या सैन्याधिकार्‍याचा चेहेरा यायला लागला.

तसं मला ब्रिगेडिअर बाबा जाधव फक्त ऐकुन माहिती होते. आण्णा आणि आईकडुन समस्त जाधव घराण्याचा
इतिहास अनेकवेळा ऐकलेला. इतिहासप्रसिद्ध घराणं. बापजाद्यांनी तलवारी गाजविलेल्या. भंडारा उधळावा त्या भक्तिनं आणि सहजतेनं रणांगणांवर रक्त उधळणारं घराणं. इमानीला आणि जबानीला पक्के अशी जाधवांची ख्याती. नांदुर्णीला आमच्या बांधाला बांध लागुन जाधवांची शेतीवाडी. दोघांच्याही पूर्वजांना खर्ड्याच्पा लढाईत बजावलेल्या कामगिरीबद्दल इनामजमीन मिळाली. खर्ड्याच्या लढाईचा हा समान धागा पुढच्पा पिढ्यांनी आपलेपणाने जपला. खेळीमेळीने सख्खे शेजारी म्हणुन एकत्र नांदले. सणवार, जत्रायात्रा बरोबरीने केल्या. या घरची लेक सासरी जायला निघाली तर त्याघरी आधी जाऊन वडिलधार्‍यांच्या पाया पडायची, त्या घरच्या आजी आणि काकी स्वताची लेक निघाल्यासारख्या डोळ्याला पदर लावुन निरोप द्यायच्या. इकडं काहि चांगलं घडलं तर तिकडं पुरणावरणाचा स्वयंपाक व्हायचा.

कालाय तस्मै नमः

कालौघ वहात असतो. जुनं जातं, नवं येतं. येणारं नवं वारं आपल्याबरोबर काहि नवे विचार घेऊन येतं. नव्या जगात जुन्या नात्यांनाच स्थान नसेल तर तो जिव्हाळा कुठुन येणार? आपलेपणाच्या ओलाव्यावर दुष्काळ पचवाणारी माणसं पोटार्थी होतात तेंव्हा त्यांची नियत फिरतेच. राजेरजवाड्यांबरोबर लढाया संपल्या पण परकिय राजवटीबरोबर संघर्ष सुरु झाला. हा संघर्ष चालू होता
तोवर दोन्ही घराणी एक झाड दोन फांद्या इतकी अभेद्य होती. स्वातंत्र्य मिळालं आणि वाटा वेगळ्या झाल्या. जाधवांनी फेटा उतरवला आणि पांढरी टोपी चढवुन राजकारणाच्या आखाड्यात उडी मारली. आमच्या पूर्वजांनी शिक्षणाची वाट आधीच धरलेली, त्याच वाटेवर पुढचे निघाले. शेतीशी संबंध तुटत गेला तो इतका कि आण्णांनी सगळि शेती सर्कत्याच्या भरंवशावर सोडली. गाव सोडलं आणि आम्ही पक्के शहरी होऊन गेलो. नावापुरते शेतकरी राहिलो. हुरड्याचे मानकरी.

"कुणाचा फोन होता रे?" आईच्या प्रश्र्नाने मी भानावर आलो. आईची देवपूजा झालेली दिसते.
"ब्रिगेडिअर बाबा जाधवांचा होता. त्यांनी रविवारी नांदुर्णीला बोलावलंय"
"अरे देवा! आता काय नवीन खेकट काढलंय जाधवांनी? आणि तुझा हा ब्रिगेडिअर म्हणजे म्हाळसाकाकीचा मुलगा ना रे?"
"आई, आता जाधवांची वंशावळ का पाठ आहे मला? काय काम आहे ते सांगितलं नाही पण महत्वाचं काम हातावेगळं करायचं म्हणत होते."
" जा बाबा तो येवढं बोलावतो आहे तर. त्याला म्हणाव, आतातरी तो बांधाचा झगडा मिटव रे.किती पिढ्या खपायच्या या वादात? तुझं तर तुझं खरं पण संपव बाबा एकदाचं"

आईचं म्हणणं खरं होतं. चार पिढ्यांपूर्वीपर्यंत गुण्यागोविंदानं एकत्र नांदणार्‍या आमच्या दोन घराण्यांत बांधावरुन वाद सुरु झाले आणि विकोपाला गेले. कोर्टकज्ज्यापायी दोन्ही घरांनी अमाप संपत्ती अक्षरशः उधळली. इरेसरीला पडलेले दोन्ही घरातले कर्तै पुरुष अहमहमिकेने लढत आणि आयुष्षाच्या अखेरीस हा नकोसा वारसा पुढच्या पिढिच्या हाती देत. कोणाच्या मनांत कली शिरला होता आणि कोण राजा हरिश्र्चंद्र होता हे कोर्टाला अजुन ठरवता आलं नव्हतं. मलाही ह्या वादाचा फटका बसलाच होता. ती जीर्णशीर्ण झालेली कागदपत्रं सांभाळायची. हॉस्पिटलमधले पेशंटस सोडुन कोर्टात हजर रहायचं आणि पुढची तारीख घेऊन परत यायचं. प्रत्येक तारखेवेळी आईची फार घालमेल व्हायची. सकाळपासुन देवांना पाण्यात बुडवुन ठेवायची आणि त्यांना आपलं गार्‍हाणं ऐकवायची. मी कोर्टातुन परत आल्यावर अधीरतेनं विचारायची
" शिरु, झाला ना रे आपल्यासारखा खटला??

तिला काहिच झालं नाही हे कसं सांगावं हा प्रश्र्न मला नेहेमी पडायचा. मग माझं मौन पाहुन ती समजुन जायची.

" होईल बरं, लवकरच. देवाच्या दारी उशीर असला तरी न्याय असतोच रे" असं म्हणुन माझी समजूत काढायची. पण मनातुन ती खट्टु झालेली असायची. हा राग दुसर्‍या दिवशी बिचार्‍या देवांवर निघायचा.
" कसं दिसत नाही तुम्हांला ? का तारखेच्याच दिवशी झोप लागते कि काय?" बिचारे देव निमूटपणे ऐकुन घ्यायचे.

रविवार उजाडला. मी सकाळीच निघालो आणि बरोब्बर न्याहारीच्या वेळेसच नादुर्णीला पोहोचलो. शिरस्त्याप्रमाणे बबन्याच्या हॉटेलात शिरलो तर बबन्या पुढं येऊन म्हणाला
"या गाववाले. तुमचं स्वागत आहे"
"नाटकं बंद कर बबन्या, भूक लागलीये, मिसळ दे पटकन"
" डॉक्टरसाहेब, आज नाष्ट्याला मिसळ न्हाई. लोणी लावलेला पाव खावा पाव. आणि जोडीला मंजुळाच्या हातचं आम्लेट. मजाय राव तुमची!"
"बबन्या, काय चेष्टा लावलीय राव?"
"च्येष्टा नाही आणि फिष्टा नाही, ब्रिगेडिअरसाहेबांचा हुकूम आहे. आल्याआल्या वाड्यावर लावुन द्या"

हुकूम आहे म्हटल्यावर नाईलाज होता. बबन्याच्या 'एवन' हॉटेलातील तिखटजाळ मिसळ आणि घट्ट दुधातला चहा सोडुन निघणं तसं जीवावर आलं होतं. हे मंजुळा काय प्रकरण आहे? विचारायचं राहुनच गेलं. एवढ्यात जाधवांची गढी आलीच.

भलाथोरला, जुन्या वैभवाची साक्ष देत उभा असलेला वाडा. किती पिढ्या बघितल्यात यानं कोणास ठाउक? तो दिंडिदरवाजा ओलांडुन मी आत पाऊल टाकलं मात्र,तेवढ्यात
"यावं, यावं डॉक्टरसाहेब. आपलं स्वागत आहे" असं अगदी करड्या आवाजातलं स्वागत कानी आलं.मी मान उचलुन बघितलं तर समोर एक ब्राँझचा पुतळा वाटावा असा रापलेल्या पण तुकतुकित चेहेर्‍याचा, भरदार अंगयष्टीचा, पांढर्‍या पण अक्कडबाज मिशांचा अस्सल लष्करी बाण्याचा ,'पुरुष' उभा. हेच ब्रिगेडिअर बाबा जाधव. शंकाच नाही. अंगाप्रत्यंगातुन ती लष्करी आदब झळकते आहे, नजर अत्यंत स्थिर, मूर्तीमंत खानदानी व्यक्तिमत्व. या पहिल्या दर्शनानेच मी भारावलो. चटकन पुढे होऊन पाया पडलो तर मला उचलुन मिठीत घेत म्हणाले
"आपण कसले आमचे पाय धरता? आपली जागा इथं. आमच्या ह्रदयाशी. आपण बसावं डॉक्टरसाहेब."
आम्ही दोघेही स्थानापन्न झाले. थोड्या ईकडच्यातिकडच्या गप्पा झाल्या. ब्रिगेडिअरसाहेब आता निव्रुत्त झाले आहेत, एकुलती एक मुलगी लग्न करुन परदेशी स्थायिक झाली. अर्धांगिनीला संसार अर्धवट टाकुन जावं लागलं.वगैरे गोष्टी समजल्या.

"मंजुळा", ब्रिगेडिअरसाहेबांनी शक्य तितक्या सौम्य आवाजात हाक मारली.
"आले बाबा" आतुन नाजुक प्रतिसाद.
हातात न्याहरीच्या पदार्थांनी भरलेला ट्रे घेऊन एक सावळी पण नाकिडोळि तरतरीत मुलगी आली.
"ही आमची मानसकन्या मंजुळा."
"मानसकन्या?" मी
"होय, हिचे आईवडिल आमच्याच शेतीवर होते. गेल्यावर्षी दुर्दैवाने अपघातात गेले. नेमके त्याच वेळी आम्ही निव्रुत्त होऊन परत आलो. तेंव्हापासुनअगदी सख्ख्या मुलीनं घ्यावी अशी आमची काळजी घेते. आता हिच्या लग्नाची काळजी आहे. कोणी चांगलासा मुलगा आपल्या पहाण्यातअसेल तर बघा. पण आधी न्याहारी सुरु करा."

सर्व पदार्थ अत्यंत चविष्ट होते. बबन्याकडची मिसळ हुकल्याचे दुःख जरा कमी झालं.

न्याहारीनंतर ब्रिगेडिअरसाहेब मला आतल्या खोलीत घेउन गेले.
"डॉक्टरसाहेब, महत्वाचं बोलायचं होतं."
"बोलूयात, पण साहेब म्हणू नका. आपण वडिल, आपण मला शिरु म्हणू शकता."
"खरंय, असल्या उपाध्यांनी आपलेपणा कमी होतो. तर शिरुभाऊ, मी आपल्यासाठी बाबा, हवं तर बाबाकाका म्हणा."
अखेर बाबासाहेबवर तह झाला.
"तर शिरुभाऊ, आमचं सारं आयुष्य सैनिकी पेशात गेलं. पण गावच्या मातीची ओढ काहि संपली नाही. म्हणतात ना, ज्या जागी तुमची नाळ पुरलेली असते त्या जागी मन ओढ घेत रहातं. याच गावांत आमचं लहानपण गेलं. त्पावेळी तुमचे वडिल आण्णासाहेब म्हणजे आमचे हिरो. आख्ख्या गावांत शेक्सपिअर वाचलेला आणि पचविलेला एकमेव माणूस. त्याकाळी थोरली माणसं एकमेकांशी फटकुन वागत पण मुलांवर बंधनं नव्हती. याचा फायदा घेऊन आम्ही आण्णासाहेबांकडुन उदंड शिकलो. त्यावेळच्या आपल्या दोन घरांमधला एक रिवाज सांगतो. या घरात माप ओलांडुन येणारी नवी सून या घरात येण्याआधी त्या घरी जात असे. प्रथेनुसार आपल्या मातोश्रीदेखील आधी या घरी आल्या. त्यांना काय वाटलं कोणासठाऊक पण त्यांनी आमच्या आईसाहेबांना बघितलं आणि 'आई' म्हणुन घट्ट मिठी मारली. आपल्या पारंपारिक वैराच्या सीमा अस्पष्ट व्हायची ही सुरुवात. हा प्रसंग आमच्या मनात कायम कोरल्यासारखा राहिला. निव्रुत्तीनंतर आम्ही हाच धागा पुढं न्यायचा ठरविलं आणि या सीमाभिंती पाडायचं ठरविलंय. आयुष्य सीमेवर गेलंय. सीमांच रक्षण करतांना कधी जीवावरवरचे खेळ खेळावे लागतात पण हे खेळ खेळतांना एक गोष्ट ध्यानांत राहिली ती म्हणजे अशा सीमांमुळे निर्माण झालेलं वैर संपविण्याचा सर्वोत्तम मार्ग तलवारीचा नसुन प्रेमाचा असतो. आता काही जणांना प्रेमाची भाषा समजतच नसेल तर ती शिकविण्यासाठी बंदुका आणि तलवारी हाती घ्याव्याच लागतात. तशा त्या आम्हिही हाती घेतल्या आणि यथेच्छ वापरल्यादेखील. रणांगण निष्ठुर असतं. तिथं मायेच्या ओलाव्यांना जागा नसते. पण हे आपलं आयुष्य आहे, इथं मतभेदांची मुळं नष्ट करण्यासाठी शिरुभाऊ, अंतरीचं प्रेमच उपयोगी ठरतं. आमचं ठरलंय. आता आपली वादातली जमीन अर्धीअर्धी वाटुन घ्यायची. वादाच्या सीमा ओलांडुन पुन्हा पूर्वीसारखं प्रेमानं रहायचं. आणखी एक मागणं आहे. तुम्ही तुमची जमीन कसायला घ्या. नांदती ठेवा तिला. आमचं आयुष्य या मातीच्या सेवेत गेलंय, आधी सैनिक म्हणुन आणि आता शेतकरी म्हणुन. एक सांगतो, या मातीच्या सेवेसारखं दुसरं सुख नाही. तिच्पावर प्रेम करा ती तुम्हांला भरभरुन दिल्याशिवाय रहाणार नाही. तुमचा होकार असेल तर उद्याच कागदपत्र करुन टाकू."

हा प्रस्ताव नाकारणं कठिण होतं. समोरचा माणूस लष्करी शिस्तितुन आलेल्या नितळपणाचं साक्षात उदाहरण होता. कुठलेही डावपेच नसलेला हा प्रस्ताव मी चटकन स्विकारला आणि माझ्या होकारानंतर बाबासाहेबांनी पुन्हा एकदा मला मिठीत घेतलं. कोणा पूर्वजाच्या अप्पलपोटेपणापायी दोन घराण्यामध्ये उभ्या राहिलेल्या सीमाभिंती ढासळल्या. दुसर्‍या दिवशी आम्ही कागदपत्रं करुन घेतली आणि बाबासाहेबांचा निरोप घेऊन निघालो.

घरी आलो. शरयू दारातच उभी होती.
"आधी आईंना भेट. कालपासुन देव पाण्यांत घालुन बसल्या आहेत."
मी आईकडे गेलो. पेढ्यांचा पुडा तिच्या हाती दिला. घडलेलं सगळं सांगितलं. बाबासाहेबांचं एकुण व्यक्तिमत्व, त्यांनी आईची सांगितलेली आठवण, मंजुळा वगैरे. ऐकतांना तिच्या डोळ्यांतुन अश्रुधारा. कशाच्या? अखेर वाद मिटला म्हणुन कि म्हाळसाकाकीच्या आठवणींच्या?

सकाळी उठलो तर देवघरातुन आवाज येत होते. आता काय? मिटला ना वाद? पण देवांची सुटका झालेली दिसत नाही. मी आईची समजूत घालायला पोहोचलो तर अनोखं द्रुष्य.

"चांगली बुद्भि दिलीस रे बाबा त्या ब्रिगेडिअराला. हसू नकोस, म्हाळसाकाकीचे संस्कार वाया नाही जायचे याची खात्री होती मला. फार रागावले कारे तुझ्यावर? पण काय करु रे घरच्या कर्त्यासवरत्पा पुरुषांची त्या वादापायी होणारी फरफट बघवायची नाही रे मला. तू माझा आपला म्हणुन तुझ्यावर राग निघायचा इतकंच. आता ही फुलं घे, छान गंध लावते बघ तुला. निवांत रहा. अशीच क्रुपा ठेव. आमच्यावर आणि जाधवांवरपण. कळलं ना?"

समस्त देवांना कळलं असावं बहुतेक, कारण आई उठली आणि मला पाहुन म्हणाली,
"आपलेच आहेत जाधव. आपलं झालं, आता त्यांचंदेखील भलं होऊ देत असं निक्षुन सांगितलंय माझ्या देवांना. घे , खडीसाखरेचा नैवेद्य."
" आई, देवांची काय बिशाद आहे? तुझं नाही ऐकलं तर रोज ऐकुन घ्यावं लागणार बिचार्‍यांना,"

यानंतर नांदुर्णीला येणंजाणं वाढलं बाबासाहेबांच्या आज्ञेनुसार आणि मार्गदर्शनानुसार शेती करायला घेतली. बघताबघता शिवार फुलुन आलं. बाबासाहेबांच्या गाठीभेटी होत राहिल्या.

आमचा वाद संपल्यानंतर वर्षभरातली गोष्ट असेल. मी नांदुर्णीला गेलो. सवयीनं आधी बबन्याच्या एवनमध्ये. तिथं शांतता. बबन्या कुठंतरी आत बसलेला.
"काय रे, आज शुकशुकाट का येवढा?"
"ब्रिगेडिअरसाहेब.....
" काय झालं बाबासाहेबांना?"
"त्यांना आत घेतलंय खुनाच्या आरोपावरुन."

बाबासाहेबांच्या मळ्यावर अनेक माणसं काम करायची. त्या माणसांना हवं नको ते पहाण्याचं काम मंजुळाकडे. बाबासाहेब नसतील त्यादिवशी तर तीच मालकिण असायची. अशाच एके दिवशी बाबासाहेब काही कामानिमित्ताने जवळच्या गांवी गेले होते. शेतीचं फारसं काम नसल्याने एकदोनच गडीमाणसं होती. त्यातला एकजण डोकं दुखतंय म्हणुन घरी गेला. आसपास कुणी नाही हे बघुन दुसर्‍या गड्याने मंजुळावर हात टाकला. प्रतिकार झाला पण तोकडा पडला. माणूसपणाच्या सीमा पार झाल्या आणि पशुंनीही लाजावं अशी घटना घडली. बाबासाहेब परत आल्यावर मंजुळानं आकांत मांडला. तिचं आक्रंदन बाबासाहेबांना ऐकवेना. तडक बाहेर पडले. त्या गड्याला गावच्या चौकात गाठला आणि हातातल्या काठीचा एकच फटका दिला. घाव वर्मी बसला. रक्त नाहि आणि खूण नाही गडी जागेवरच गेला. तिथुन बाबासाहेब पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले आणि कबुलीजबाब देऊन मोकळे झाले.

मी चौकीवर गेलो. बाबासाहेबांना भेटता येईल का ते विचारलं तो फौजदार बिचारा आधीच या लोकविलक्षण प्रकाराने गोंधळलेला दिसत होता. त्याने मला परवानगी दिली. मी आतल्या खोलीत गेलो. तिथं एका खुर्चीवर बाबासाहेब ताठ मानेनं बसलेले.

"बाबासाहेब."

"शिरुभाऊ, सांत्वन नका करु. आम्हांला खेद नाही. या स्त्रियांची अब्रू कायम सुरक्षित रहावी म्हणुन तर आम्ही सीमेवर लढलो ना? मग आमचं कर्तव्य बजावतांना कोणीहि आडवा आला त्याला खतम केलाच पाहिजे. अगदी कायदादेखील आम्हांला थांबवु शकत नाही. सीमारक्षण काय फक्त देशांच्या सीमांवरच होतं काय? स्त्रीची अब्रू हा तिचा आत्मसन्मान आहे. त्याच्या सीमा ओलांडायचा हक्क कोणालाच नाही हे आम्ही आमच्या लष्करी जिवनांत शिकलोय. आम्ही कबुलीजबाब दिला आहे. गांवकर्‍यांना नाही पटलं त्यांनी लिहुन दिलंय कि तो अपघाती म्रुत्यु त्यांच्यासमोर घडला म्हणुन. आभारी आहे मी त्यांचा आणि तुमचादेखील.या आता आपण, वेळ संपत आली. कायद्याच्या सीमा ओलांडणं योग्य नव्हे."

घरी येऊन शरयूला आणि आईला सर्वप्रकार सांगितला. डोळ्यांना पदर लावत आई खोलीबाहेर गेली. मी हातपाय धुवुन बाहेर येतो तो देवघरातुन आवाज येत होते.

" काय हा अन्याय? अरे तुम्हिच नेमुन दिलं ना हे काम त्याला? मग त्याला शिक्षा का? आणि काय रे, द्रौपदीच्या अब्रूला हात घातला म्हणुन भलंथोरलं युद्ध घडवलंस ना तू? लाखो माणसं मेली. तुला कोणी बोलायच? तू देव ठरलास आणि तो मात्र गुन्हेगार काय? वा रे वा , बरा आहे तुझा न्याय! अरे तुझ्या जन्माष्टमीला म्हाळसाकाकीनं तिच्या पदरात जोजवलाय तुला. चांगले पांग फेडतोहेस हो तिचे. पोत्यांवारी फुलं उधळलीत जाधवांनी तुझ्यावर. जाधवांच्या कैक पिढ्यांचे फेटे झिजलेत तुझ्या पायावर. त्याची तरी बूज राख जरा. ते काही नाहि जाधवांचं आमचं घर एकच आहे. आमचा पोर आम्हांला सुखरुप माघारी पाहिजे. नांव विसरु नकोस, ब्रिगेडिअर बाबा जाधव."


श्रीकुल
श्रीक्रुष्ण जयंती
23/8/2019










Sunday, 11 August 2019

विदर्भकन्या

प्रत्येक जागेला एक कहाणी असते. आपल्या जन्मगावाशि किंवा ज्या जागी आपण वाढतो, घडतो त्या जागेविषयीच्या तर अनंत कहाण्या मनात घर करुन असतात. काही वेळा मन कातर होऊन जातं आणि या तळाशी निवांत पहुडलेल्या कहाण्या वरवर येतात. लाटांवर लाटा येतात आणि घडतं ते चिंब करणारं स्वप्नस्नान. यातली मेख अशी कि आठवू म्हणता आठवेना असं अनेकदा घडतं आणि कुठल्यातरी अनामिक खुणगाठेतून आठवणींच्या लडीवर लडी उलगडतात आणि आठवांचा चलचित्रपट मनाच्या पडद्यावर सुरू होतो. तो थांबवणं आपल्या हातात मात्र नसतं.
अमरावतीला जाणं तसं अचानकच ठरलं. भारीच गडबड झाली. पेशंट तपासले आणि अचानक घरी जाऊन शरयूला सांगितलं,
"माझी बॅग भरायला मदत कर मी अमरावतीला निघालोय" शरयू अवाक. अशा अवाक स्थितितली बायको शतप्रतिशत संशयीप्रश्न विचारतेच.
"कोणाबरोबर?"
आता मी अवाक.
" कोणाबरोबर म्हणजे? तुला काय वाटलं?"
"मला काहिच अंदाज नाही म्हणुन विचारलं कि बरोबर कोण आहे? आणि आज अचानक "अमरावतीचं' प्रेम ऊफाळुन आलंय. तर विचारावं म्हटलं"
"तू भलते विचार करू नकोस, गोंद्याचं लेक्चर आहे तिथं ऊद्या तर तो म्हणाला कि चल बरोबर. नाहीतरी रविवारी तू शरयूचं डोकं खाण्याशिवाय दुसरं काय करणारेस? तस्मात आस्मादिकांनी त्वरित निर्णय घेतला आणि निघालोय. स—म—ज—लं ?"
"अमरावतीचे निर्णय कसे झटपट होतात ना! रोखुन बघू नकोस, वेडसर वाटतो आहेस. घे तुझी बॅग."

अमरावतीचे निर्णय?

मला बाउंसर होता. मी काही विचारणार इतक्यात
"शीर्‍या' ए वैदू चल लवकर"अशी ,आदरणिय डॉ. गोंद्याची (M. Tech. Ph.D.) हाक आली. मी झटपट निघालो पण.

प्रवास आणि गोंद्याबरोबर म्हणजे डबल धमाल. तेवढं त्याचं भसाड्या आवाजातलं मुक्तगान आणि जणू टास्मानियन डेव्हिलच्या वंशात असल्यासारखं अखंड चरणं सोडुन.

सकाळी अमरावतीला पोहोचलो. शरयूला फोन केला.
तर मी काही बोलायच्या आतच बाईसाहेब
"पोहोचले का लाडक्या अमरावतीला?"
" शरयू, काय चालवलं आहेस हे?"
" काहि नाहि, मी मुलींना घेऊन तुळशीबागेत भटकायला जाणार आहे"
"हॉस्पिटल?"
"सगळी बाळं ठणठणीत आहेत आणि त्याच्या आया मजेत आहेत. तू कापाकापी केलेल्याकडे डाॅ अवी बघेलच. चल बाय. मला आवरायचंय. ए वल्लरी आवर गं"

हा गुगली मला समजलाच नाही. शरयू इतकी अपसेट का? जाऊदेत, असेल काहितरी. मी विषय सोडुन दिला. गोंद्याच्या कार्यक्रमाचे आयोजक आले होते त्यांच्याबरोबर गांव बघायला निघालो.

एका नितांतसुंदर प्राचीन मंदिरात आम्ही गेलो. अतिशय देखणं देऊळ.मी भान हरपुन बघत होतो. किती सुंदर कलाकुसर, दगड नव्हतेच. काळ्याकभिन्न, बोलक्या प्रतिमा. त्यांना जर कंठ फुटला तर आत्ता सांगतील त्या कहाण्या, त्यांना घडविणार्‍यांच्या.

आयोजक सांगत होते,
"अशी अख्यायिका आहे कि क्रुष्णानं रूक्मिणीहरण याच मंदिरातुन केलं. ती विदर्भकन्या होती ना?

'विदर्भकन्या' हा शब्द कानी पडला आणि मी 'माझा न मी राहिलो'.वयाची पस्तीसहुन अधिक वर्षै गळून पडली. मी आणि चित्रा नववीत होतो. आमची वक्त्रुत्वस्पर्धा होती. स्पर्धा म्हणजे तसा मी जिंकणारच होतो पण औपचारिकता बाकी होती इतकंच. विषय छानच होता. 'स्त्री—स्वातंत्त्र्य आणि परंपरा'. जरा जडच विषय होता पण चित्राच्या आईकडुन संदर्भपुस्तकं आणुन मी जाम तयारी केली होती. भाषणबिषण हा चित्राचा प्रांत नव्हता. तिनं आदल्यादिवशी माझं भाषण ऐकलं आणि निकालच जाहिर केला
"नानू, किती छान बोलतोस रे तू! पहिलं बक्षिस तुलाच"
माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं या कौतुकाने.

स्पर्धा सुरू झाली. आमची भाषणं झाली.माझ्या भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट. मी उपनिषदांचे दाखले देउन सांगितलं कि स्त्रीस्वातंत्र्य हीच आपली परंपरा आहे. गार्गी, मैत्रेयी सारख्या विदुषी या या स्वातंत्याची मधुर फळं आहेत. सरतेशेवटी,
अहल्या द्रौपदी तारा, सीता मंदोदरी तथा
पंचकन्या स्मरैन्नित्यम, सर्व पातकनाशनम
हा श्र्लोक म्हणुन खाली बसलो. दोघेतिघे शिक्षक माझं अभिनंदन करून गेले. आमचे हेडसर माझ्याजवळ आले आणि काहिही न बोलता त्यांनीमला पोटाशी धरलं. आता बक्षिस पक्कं.
स्टेजवर गेल्यावर हेडसरांना काय वाटलं कोणास ठाऊक त्यांनी विचारलं कि ऐनवेळी कोणाला बोलायचं आहे का?
एक हात अनपेक्षित होता. चित्रा उभी राहिली आणि स्टेजवर गेली. त्यानंतरची पंधरा मिनिटे आठवली कि आजही अंगावर सर्रकन काटा येतो. भाषण कसलं, अंगार ओकत होती.
" हा विषयच चुकीचा आहे. स्त्री हा स्वातंत्र्याचा पहिला
स्वर आहे. तिचं स्वातंत्र्त्र देवदत्त आहे, निसर्गदत्त आहे.
पुरुषांना असलेलं स्वातंत्र्य ही स्त्रीनं उदारतेनं दिलेली मुभा आहे इतकंच. स्वातंत्र्याचा अर्थ उमगलेलि स्त्री आपलं अंगण स्वताच ठरविते आणि त्या अंगणाचं नंदनवन करु शकते. मी विदर्भकन्या आहे. विदर्भाच्या तीन कन्यांनी मी जे सांगते आहे ते जगुन दाखवलंय.
एक रूक्मिणी होती, तिच्या वडिलांनी तिचा विवाह चेदिराज शिशूपालाशी ठरविला पण तिच्या मनी क्रुष्ण होता. श्र्लेषअलंकार आठवतो ना?

'शिशुपाल नवरा, मी न—वरी
श्रीक्रुष्ण नवरा, मी नवरी'

स्वयंनिर्णयाचं स्वातंत्र्य.

हेच दुसर्‍या विदर्भकन्येनं म्हणजे दमयंतीनंदेखील केलं

तिसर्‍या विदर्भकन्येनं म्हणजे वीरमाता जिजाईनं तर एकूणच स्वातंत्र्याला नवा अर्थ दिला. परंपरांचं म्हणाल तर सीता आणि सावित्रीपासुनचं सांगता येईल कि स्वातंत्र्याची उद्गाती तीच आहे आणि तिनंच स्वमर्यादांची आखणी केलेली दिसते. "

चित्रा थांबली. आम्ही इतके आवाक झालो होतो कि टाळ्या वाजवायचंदेखील भान नव्हतं.

पहिलं बक्षिस पहिल्यंदाच माझ्या हातुन गेलं पण आज मला पराजयातदेखील आनंद वाटत होता.

बक्षिस घ्यायला चित्रा टाळ्याच्या कडकडाटातच स्टेजवर गेली. आणि अपूर्वाईचं केलं.

"मला बक्षिस घेण्याआधी बोलायचं आहे"

हेडसरांनी परवानगी दिली.

"मी ऐक मुलगी आहे आणिमीस्त्रियांच्या बाजुनेच बोलणार पण शिर्‍यानं मुलगा असुनहि स्त्रियांची बाजू फार अभ्यासपूर्ण मांडली. सर, मला हे पारितोषिक त्याच्या बरोबर शेअर करता येईल का? हा स्वयंनिर्णय मला घेऊ द्याल ना सर?"

गदगदलेले हेडसर ओठांनी बोलूच शकले नाहित त्यांनी डोळ्यांनीच होकार दिला.

शाळेत आणि कॉलेजमध्ये मिळविलेली शेकडो
बक्षिसं कुठंतरी पडली आहेत.हा छोटुला कप मात्र शोकेसमध्ये अगदी पुढे आहे.

पुण्याला परत आलो.

प्रवासाने दमलो होतो. मुलींना पाहुन थकवा दूर पळाला. माझ्या गळ्यात पडुन वल्लरी म्हणाली
"अरे आम्ही ना झकास मजा केली. खूप फिरलो, काय काय घेतलं आईनं आम्हांला. आणि ऐक ना आईनी ना तुझा तो लाडका बक्षिसाचा कप आहे ना त्याला तुळशीबागेतुन मस्त पॉलिश करुन आणलंय"

"आँ!!!" माझ्या तोंडुन

"विदर्भाच्या बाहेरच्या मुलीदेखील स्वयंनिर्णय घेऊ शकतात म्हटलं" अर्थात शरयू.दुसरं कोण?

श्रीकुल
११/८/२०१९



कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...